बनावट पत्राचे रहस्य उलगडले

| मुंबई । दिलीप जाधव ।
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 29 सप्टेंबर 2020 रोजीच्या पत्रानुसार 12 राज्यपाल नामनियुक्त आमदारांच्या नियुक्त्या केल्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना केल्याच्या बनावट पत्राने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र राजभवनाने सदर पत्र बनावट असल्याचा खुलासा केला आहे. 1)वीरभद्रेश करबसप्पा बसवंती(सामाजिक)2)रमेश कोकाटे (राजकीय)3)सतीश घरत (उद्योग)4)संतोष नाथ(सामाजिक)5)जगन्नाथ शिवाजी पाटील(सामजिक)6)मोरेश भोंडवे(राजकीय) अशी ही नावे आहेत. ह्या सर्व नावांचा राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्याचा ठराव राजभवनाकडे पाठविण्यात यावा अशा आशयाचे बनावट पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे पाठविण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारने मात्र राज्यपालांकडे काँग्रेसचे सचिन सावंत(सहकार आणि समाजसेवा), मुझफ्फर हुसैन (समाजसेवा), रजनी पाटील, अनिरुद्ध वणकर ,राष्ट्रवादी काँग्रेस – एकनाथ खडसे (सहकार आणि समाजसेवा), राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा), प्रा. यशपाल भिंगे (साहित्यिक) आनंद शिंदे (कला)शिवसेना – उर्मिला मातोंडकर (कला), नितीन बानगुडे-पाटील (साहित्यिक), विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी आदी नावांची शिफारस विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रिक्त झालेल्या जागेवर लवकरात लवकर नियुक्ती करावी अशी मागणी वारंवार महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना 12 जणांच्या यादीचे पत्र पाठवले होते . मात्र राज्यपालांकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. म्हणून राज्यपाल विरुद्ध राज्यसरकार असा वाद उभा ठाकला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे शिष्टमंडळ 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी वेळोवेळी राज्यपालांना भेटत आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावांना राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिली नाही.

Exit mobile version