| पनवेल | प्रतिनिधी |
मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांवर मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत कारवाई करत प्रादेशिक परिवहन विभागाने एकूण 33 वाहने अटकावून/जप्त केली आहेत. संबंधित वाहन मालकांना थकित कर भरण्याबाबत वारंवार कळविण्यात आले असतानाही कर न भरल्याने या वाहनांचा जाहीर ई-लिलाव दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे, असे कराधान प्राधिकारी तथा सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हरिभाऊ जेजुरकर यांनी कळविले आहे.
जप्त वाहनांमध्ये श्री व्हीलर (प्रवासी), मोटार कॅब, मॅक्सी कॅब, मालवाहू वाहने, बस, एचजीव्ही डम्पर तसेच दुचाकी यांचा समावेश आहे. ही वाहने सध्या अण्णा पार्किंग, स्टील मार्केट येथे ठेवली आहेत. ई-लिलावाव्या तारखेपर्यंत चकितदार वाहन मालकांना कर भरण्याची संधी आहे. थकीत मोटार वाहन कर, पर्यावरण कर व शासकीय दंडाची रक्कम कार्यालयात भरून आपली वाहने सोडवून घ्यावीत. तसेच लिलावास हरकत असल्यास दि. 20 जानेवारीपर्यंत लेखी हरकत नोंदवावी. त्यानंतर कोणतीही हरकत नसल्याचे गृहीत धरून लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची सविस्तर यादी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली असून, इच्छुकांनी सहभागी व्हावे. ई-लिलावाच्या अटी व शर्तीची माहिती कार्यालयीन वेळेत उपलब्ध असल्याचेही परिवहन स्पष्ट केले आहे.





