श्रमिक जिमखाना मैदानावर रंगणार उपांत्य फेरीच्या लढती

Oplus_131072

| मुंबई | प्रतिनिधी |

अमर हिंद, डॉ. शिरोडकर, शिवशक्ती महिला यांनी महिलांत, तर जय भारत, अंकुर स्पोर्टस्‌‍‍ यांनी पुरुषांत आंबेकर चषक कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक दिली. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मुंबई यांच्या विद्यमाने ग.दि. आंबेकर सप्ताहनिमित्त अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे या विविध गटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

तिसऱ्या दिवशी झालेल्या महिलांच्या उप उपांत्य सामन्यात अमर हिंद मंडळाने श्री स्वामी समर्थ मंडळाचा कडवा प्रतिकार 25-23 असा मोडून काढला. साईक्षा पेडणेकर, रिया मांड यांनी आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात अमर हिंदला 17-08 अशी आघाडी मिळवून दिली होती. उत्तरार्धात श्री स्वामी समर्थच्या लेखा शिंदे, आर्या रावळ, सई शिंदे यांनी आपला खेळ उंचावत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण त्यांना वेळेचे गणित साधता न आल्याने 3गुणांच्या निसटत्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात उपांत्य फेरी गाठताना डॉ. शिरोडकर संघाने भारतमाता स्पोर्टस्‌‍‍ चा 51-21 असा सहज पाडाव केला. मध्यंतराला 35-09 अशी आघाडी घेणाऱ्या शिरोडकरने नंतर सावध खेळ करीत आपला विजय सोपा केला. रुचिता पटेल, वैष्णवी जाधव यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. भारतमाताची रिया मोहरेलिया चमकली.

शिवशक्ती महिला संघाने गोलफादेवी प्रतिष्ठानवर 42-13 अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावात 2 लोण देत 23-04 अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत 29 गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. शुभदा खोत, रिया मडकईकर, अक्षता पाटील यांच्या चतुरस्त्र खेळाने शिवशक्तीने ही किमया साधली. जय भारत मंडळाने पुरुषांत उपांत्य फेरी गाठताना शिवशक्ती मंडळावर 27-14 असा विजय मिळविला. आकाश केसरकर जय भारत कडून, तर साई चौगुले शिवशक्ती कडून उत्तम खेळले. दुसऱ्या सामन्यात अंकुर स्पोर्टस्‌‍‍ ने सुशांत साईलच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर अमर मंडळाचा प्रतिकार 36-02 असा सहज मोडून काढला. अमर कडून म्हणावा तसा प्रतिकार झालाच नाही.

Exit mobile version