कोकणवासियांचा आधार तुटला
। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग असून या महामार्गाच्या दुतर्फा लहान-मोठी वृक्ष होती. मात्र ती चौपदरीकरणाच्या कामात तोडण्यात आली. यामुळे प्रवाशांसहित, शेतकरी, वाटसरू यांना असणाऱ्या सावलीचा आधार तुटला. शिवाय मुंबई-पुणे येथून कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही क्षणभर विश्रांतीसाठी वृक्षवल्ली उपयुक्त ठरत होती. परंतु, सद्यस्थितीत तापमानाचा पारा चढल्यामुळे आजूबाजूला थोड्या प्रमाणात असणारी झाडेही करपून गेली आहेत. यामुळे प्रवाशांना मिळणारी सावली हरपली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला असंख्य झाडे होती ती महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडण्यात आली आणि त्याची विक्री करून लाखो रुपये लाटण्यात आले. परंतु तेव्हा रस्त्याचा सर्व्हे करून त्या पैशात तोडलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडे लावण्यात आली असती तर गेली 17 वर्षात ती झाडे मोठी झाली असती. प्रवाशांसहित वाटसरू, शेतकरी यांना सावलीचा आधार झाला असता.
मुंबई-गोवा हायवेवरून वीस वर्षांपूर्वी कोकणात सुट्टीत येणाऱ्या नागरिकांना कधी उन्हाळा जाणवत नव्हता. कारण कोकणातील संपूर्ण मुंबई-गोवा रस्ता दोन्ही बाजूला झाडावेलीने फुललेला होता. यामुळे आजूबाजूला विविध प्रकारचे पशु-पक्षी, प्राणी दिसून येत असत. त्यांचे वेगवेगळे आवाज यामुळे सर्व कोकणातील परिसर प्रसन्नमय व मनमोहक करणारा होता. या वातावरणामुळे कोकणात येणारे पर्यटक यांचे मन तल्लीन होत होते. परंतु आता परिस्थिती वेगळी दिसून येत आहे. चौपदरीकरणात केलेली वृक्षतोड व आजूबाजूच्या जंगलांना लावण्यात येणारे वणवे यामुळे सर्व परिसर ओसाड पडला आहे. यामुळे दिवसेंदिवस तापमानात बदल होत चालला असून याचा प्रत्यय दोन वर्षांपूर्वी आला आहे. कारण दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील भिरा येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद झाली होती. आता मार्च ते मे महिन्यापर्यंत सूर्य जणू आग ओकत असतो. अशा उष्णतेने उरली सुरलेल्या झाडांची पानेही गळून पडत आहेत. यामुळे प्रवाशांना मिळणाऱ्या सावलीचा आधार नष्ट झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2026 पर्यंत पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची लागवड करावी. याबरोबर लागवड केलेली झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करावे. यामुळे या मार्गांवरील वृक्षवल्ली पुन्हा बरसेल व पर्यावरणात होणारा बदलही थांबेल, असे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.







