पाली-खोपोली मार्गावरील सावली परतणार

सुधागड तालुका मराठा समाज संस्थेच्यावतीने एक हजार झाडांचे रोपण

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील पाली-खोपोली राज्य महामार्गवर पाली ते खुरावले फाटा दरम्यान दुतर्फा सुधागड तालुका मराठा समाज संस्थेच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी (दि.7) आयोजित करण्यात आला होता. या राज्यमार्गाचे नुकतेच रुंदीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरना दरम्यान असंख्य झाडे तोडण्यात आली होती. या वृक्षारोपणामुळे या मार्गावर आता गेलेली सावली पुन्हा परतणार आहे.

या वृक्षारोपण मोहिमेत मराठा समाज बांधवांसह तालुक्यातील अनेक नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो असून पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे, असे प्रतिपादन सुधागड तालुका मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी केले.

सकाळी साडेआठ वाजता वृक्ष लागवडीस नियोजनबद्ध सुरुवात करण्यात आली. पाली, आंबोले, रासळ, वावे, मजरे जांभूळपाडा आणि खुरावले फाटा अशी एकाच वेळी सहा टप्प्यात ही वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. यावेळी शिसव, कांचन, बेहडा, आवळा, वावळा, करंज, इत्यादी जातीच्या 1 हजार झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड मोहिमेत सुधागड तालुक्यातील मराठा समाज बांधवासह वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही वृक्षारोपण मोहीम अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष सरचिटणीस सुजित बारसकर, खजिनदार योगेश मोरे, सर्व संचालक व संचालिका, विभागीय पदाधिकारी, गडकिल्ले, पर्यावरण व वन संवर्धन समितीचे प्रमुख अमित निंबाळकर, संचालक अरविंद दंत, संचालक प्रदीप गोळे, मिलिंद गोळे व समाज बांधव-भगिनी व वृक्षप्रेमी, सुधागड तालुका शेतकरी संघर्ष संघटना, एम.एस.आर.डी.सी, तसेच लेकसिटीचे सदानंद पाटील यांच्या विशेष सहकार्यातून यशस्वी करण्यात आली. राजेंद्र राऊत यांनी ही सर्व झाडे देऊन विशेष सहकार्य केले.

या कार्यक्रमाचा समारोप आंबोले येथील श्री गणेश हॉटेल येथे करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर व राजेंद्र राऊत यांनीही मार्गदर्शन केले.

सुधागड तालुका मराठा समाज संस्थेच्या माध्यमातून आम्ही केलेली वृक्ष लागवड याचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखील आम्ही घेतली आहे. लवकरच या झाडांना आधार देऊन ट्री गार्ड बसविण्यांत येईल. तसेच, इच्छेनुसार प्रत्येकाला आम्ही एक ते पाच झाडे दत्तक देऊन ती लोकं त्यांचे संगोपन करतील याची व्यवस्था करणार आहोत.

धनंजय साजेकर,
अध्यक्ष सुधागड तालुका मराठा समाज
Exit mobile version