। कोलकाता । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रातील नवं शिंदे सरकार लवकरच कोसळेल असे भाकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला. सोमवारी कोलकात्यातील इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये त्या बोलत होत्या.
बॅनर्जी म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाबाबत विश्वास आहे की, हे सरकार पुढे चालणार नाही. कारण हे अनैतिक आणि असंविधानिक सरकार आहे. त्यांनी भलेही सरकार जिंकले असेल पण ते महाराष्ट्राचं मन जिंकू शकत नाही. तुम्ही सत्तेचा गैरवापर करुन लोकशाहीवर बुलडोझर चालवू शकाल पण लोकशाही पद्धतीने लोक तुमच्यावर बुलडोझर चालवतील. त्याचबरोबर ममतांनी आरोप केला की, महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसाममध्ये पैसा आणि इतर गोष्टी भाजपने पुरवल्या आहेत.