पुण्यातील बस चालकाचा धक्कादायक प्रकार; दहा ते पंधरा गाड्यांना धडक

मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याचा आरोप

। पुणे । वृत्तसंस्था ।

पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यावरुन पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीएमएलच्या एका चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी हा प्रकार घडला. बस चालकाच्या विरोधात पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिसांमध्ये 308 सदोष मनुषवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत बस चालवणाऱ्या चालकाची ओळख पटली असून त्याचे नाव निलेश सावंत असे आहे.

पीएमपीएमएल चालकाचा सेनापती बापट मार्गावर काही गाडी चालकासोबत वाद झाला होता. त्यावेळी त्याने बस आधी समोर घेतली मात्र त्यानंतर त्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट बस उलटी चालवत जवळपास दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिली. हे पाहून पुण्यातील सेनापती बापट रोडवरील लोकांनी आरडा ओरड करत मदतीसाठी धावा सुरु केला. हा सगळा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये तब्बल 50 प्रवाशी होते. या सगळ्यांचा जीव धोक्यात टाकत मद्यधुंद अवस्थेतील निलेश सावंत पीएमपीएलची बस मागचापुढचा कोणताही विचार न करता चालवत होता. या अपघातामध्ये काही प्रवाशी आणि वाहनचालकांना दुखापत झाली आहे. जखमींचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. तुर्तास कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश सावंत हा पीएमपीएमएल बस चालक आहे. तो शनिवारी पीएमपीएमएलची बस (एमएच-14-एचयु-5725) घेऊन पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात होता. पोलिसांकडून आता बस चालक निलेश सावंत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याल आला असून तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणात आता प्रशासन आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Exit mobile version