चिपळूण रेल्वेस्थानक रस्त्यावरील फुटपाथला झाडा-झुडपांचा वेढा

प्रवाशांना नाहक त्रास

| चिपळूण | प्रतिनिधी |

चिपळूण रेल्वेस्थानक रस्त्यावरील फुटपाथवर गवत आणि झाडी वाढली असून फुटपाथ भकास झाले आहे. रस्त्यावरदेखील पावसाचे पाणी साचत असून वाहने जाताना पाणी अंगावर उडत असल्याने रेल्वे प्रवासी व स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामारे लावे लागत आहे. रेल्वे स्थानकाचे मोठा गाजावाजा करीत सुशोभिकरण झाले. मात्र त्याची देखभालदेखील करण्याची आवश्यकता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चुन चिपळूण रेल्वे स्थानकाचे सुसोभिकरण करण्यात आले. मोठमोठ्या प्रोफ्लेक्स सीट शेड, कोकणातील निसर्गसंपदा, जीवनशैलीचे पावलोपावली घडणारे दर्शन, उभारण्यात आलेली शिल्प यामुळे हे स्थानक चिपळूणच्या वैभवात भर टाकणारे ठरत असतानाच प्रवेशद्वारासमोरील सुशोभिकरणाची नासधूस करण्यात आली आहे. सुशोभिकरणातील वाघाचे शेपूट कुणीतरी तोडून तर सांबराची शिंगेच उपटून टाकण्यात आली. तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कोकण रेल्वे मार्गावरील पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या आणि प्रवाशांची सातत्याने वर्दळ असणाऱ्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात आले. त्यामध्ये चिपळूण रेल्वेस्थानकाचा समावेश आहे.

चिपळूण रेल्वेस्थानक आणि आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर लक्षात घेऊन त्यादृष्टीने सुशोभिकरणाचा आराखडा तयार करण्यात आला. मागील वर्षी सुशोभिकरणाचे उद्घाटन झाले. त्याची देखभाल दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. रेल्वे स्थानक रस्त्यावरील फुटपाथवर झाडा-झुडपांनी वेढा घातला आहे. फुटपाथवरील गवत काढून रस्ता चकाचक करावा व स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कदम यांनी केली आहे.

Exit mobile version