तिलारीत वाघिणीसह बछड्यांच्या पाऊलखुणा
| सावंतवाडी | प्रतिनिधी |
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वन्यजीवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तिलारी वनक्षेत्रातील दोडामार्ग परिसरात एका वाघिणीसह तिच्या दोन बछड्यांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. यामुळे या भागात वाघांचे वास्तव्य केवळ तात्पुरते नसून, तिथे वाघांचे नैसर्गिक प्रजनन होत असल्याचे सकारात्मक चित्र स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्गात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघांच्या वास्तव्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात यापूर्वी केवळ वाघांचे दर्शन होत होते, मात्र आता बछड्यांच्या खुणा मिळाल्याने या क्षेत्रात वाघांचा अधिवास स्थिरावत असल्याचे मानले जात आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील जंगल पट्ट्यात कॅमेरा ट्रॅपद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील केंब्रिज कोअर परिसरात काही दिवसांपूर्वीच वाघाचे दर्शन झाले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात गस्त वाढवली असून, विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांच्या हालचाली टिपल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे, 2014 पासून या परिसरात सातत्याने वाघांचे अस्तित्व दिसून येत आहे. नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटीच्याअहवालानुसार, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवरील हे जंगल वाघांच्या प्रवासासाठी (कॉरिडॉर) अत्यंत महत्त्वाचे आहे. गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्य आणि महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा हा दुवा आहे. या भागात वाघांची संख्या वाढत असल्याने आता या क्षेत्राला कायदेशीररीत्या व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.
2006 ते 2022: पश्चिम घाटातील वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सिंधुदुर्ग आणि तिलारी परिसरात 100 पेक्षा जास्त कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. तिलारीत प्रथमच वाघिणीसह दोन बछड्यांच्या पाऊलखुणांची नोंद झाली आहे. या नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, वन विभागाने या प्राण्यांच्या संरक्षणासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने विशेष पावले उचलली आहेत.







