गणेश देवस्थानची जागा परस्पर तीन कोटींना विकली
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
ढवळे यांनी याबाबत धर्मदाय आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर धर्मदाय आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असल्याची माहिती अनिल ढवळे यांनी दिली. त्याचबरोबर या गैरव्यवहारात गुंतलेल्या देवस्थान विश्वस्तांच्या विरोधात न्यायालयाने पैसे भरण्याचा आदेश दिला असल्याची माहितीदेखील ढवळे यांनी दिली. दरम्यान, कायद्याची पायमल्ली करुन गैरप्रकार केल्याप्रकणी गणपती विश्वस्त प्रमुख अनेश ढवळे यांच्यासह इतर कार्यकारी मंडळावर अटकेची टांगती तलवार असून, त्यापासून वाचण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याचे आरोप अनिल ढवळे यांनी केला आहे.
गणपती देवस्थान ट्रस्टची शिवकर येथे असलेली जागा विश्वस्त कार्यकारी मंडळ यांच्या नावावर होती. या जागेतील माती 2001 ते 2007 दरम्यान उत्खनन करुन विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर समस्त गणेश देवस्थान ट्रस्टचे प्रमुख अनेश गणू ढवळे यांच्याकडून जमीन विक्रीसाठी 5 कोटी 62 लाख रुपयांना ट्रीटन डेव्हलपर्स यांच्यासोबत करार झाला होता. त्याप्रमाणे देवस्थानची 183, 69, 15, 261 या सर्व्हे नंबरची जमीन विक्री करण्यात आली. यासाठी मुख्य धर्मदाय कार्यालय वरळी येथून विक्री परवानगी आणली असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये गैरव्यवहार झाला असून, याप्रकरणी शिवकर माजी सरपंच अनिल ढवळे यांनी या गैरप्रकरणाला विरोध करत पनवेल येथील दिवानी न्यायालयात धाव घेतली. त्याचबरोबर ग्रामस्थांसमवेत धर्मदाय आयुक्तालयासमोर उपोषण करण्यात आले. याची दखल सहाय्यक धर्मदाय आयुक्त अलिबाग येथून घेत प्रकरणाची चौकशी केली असता गैसव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. तसेच न्यायालयाकडूनही तीन कोटी रुपये देवस्थान ट्रस्ट यांना भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देवस्थान ट्रस्टवर काम करणारी मंडळी अडचणीत आली आहेत. पसस्पर जागा विक्री केल्याचा घोटाळा उघड झाल्याने पनवेल परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळ अडचणीत
याप्रकरणी गणपती विश्वस्त प्रमुख अनेश ढवळे यांच्यासह इतर कार्यकारी मंडळ यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा तसेच विश्वस्तांच्या मालमत्ता जप्तीचे आदेशदेखील निघू शकतात. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.