देशातील 19 राज्यांचा असणार सहभाग
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग येथील आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रीय स्तरावरील फिल्ड इनडोअर अर्चरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलयाझर्स थळ, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया आणि फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशातील 19 राज्यांमधील सुमारे 650 नेमबाजांनी आपला सहभाग या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नोंदविला आहे.
राज्यस्तरावर विजय संपादन करणाऱ्या विविध गटातील महिला आणि पुरुष धनुर्धारांच्या नेमबाजीचा कस अलिबाग येथे होणाऱ्या स्पर्धेत पहावयास मिळणार आहे. रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयातील आरसीएफ कुरुळ येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये 7 वर्षांखालील, 10 वर्षांखालील , 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील , 19 वर्षांखालील, वरिष्ठ गट आणि वरिष्ठ अनुभवी धनुर्धर गट असे गट खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा महिला आणि पुरुष अशी खेळवली जाणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.23) सकाळी 11 वाजता आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स कुरुळ अलिबाग येथे होणार आहे. या स्पर्धेत नाईन स्पॉट नावाचा धनुर्विद्या स्पर्धेतील प्रकार प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या स्पर्धेत नाईन स्पॉट प्रकार 5 गटात खेळवला जाणार आहे. यामध्ये 10 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील प्रत्येक गटासाठी प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय पारितोषिक 15 हजार आणि तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये असणार आहे. तर वरिष्ठ गटासाठी प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 25 हजार रुपये असणार आहे, अशी माहिती सुभाष नायर यांनी दिली.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्सचे कार्यपालक निदेशक हिरडे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्सचे चिफ मॅनेजर ॲडमिन महेश पाटील, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, उपाध्यक्ष संजय पिटवा, सह सचिव रितिका नायर, उपाध्यक्ष अनुप देढे, उपाध्यक्ष मनीष जेडली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.






