न्हावे ग्रामस्थांचा प्रशासक हटावचा नारा

नवीन प्रशासक नेमण्याची मागणी

। रायगड । प्रतिनिधी ।

ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायत न्हावे येथे प्रशासक राजवट आहे. ग्रामपंचायत न्हावे येथे असणारे प्रशासक हे आपल्या वर्तनातून ग्रामस्थांना दाबण्याचा प्रयत्न करीत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. प्रशासकाची नेमणूक रद्द करून नवीन प्रशासक द्यावा, अशा मागणीचे ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन न्हावे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राजश्री शाबासकर, विकास भायतांडेल, गोविंद भायतांडेल यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना दिले.

न्हावे ग्रुप ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे गटविकास अधिकारी व आपणाकडुन प्रशासक म्हणुन सुनिल गायकवाड यांची नेमणुक केली आहे. 21 ऑगस्ट रोजी प्रशासक यांनी ग्रामसभा आयोजित केली होती. महात्मा गांधी तंटामुक्त समिती नेमण्याबाबत विषय घेण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी हा विषय चर्चेला नेला असता प्रशासक अधिकारी सुनिल गायकवाड यांनी सांगितले की, ग्रुप ग्रामपंचायतील न्हावे हद्दीतील कोणीही प्रतिष्ठित नागरीक महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होवु शकत नाही. अध्यक्ष प्रशासक म्हणून माझीच नेमणूक असणार आहे. असे सांगून ग्रुप ग्रामपंचायत न्हावे हद्दीतील ग्रामस्थांचा अधिकार हिरावुन घेतला आहे, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.

5 वर्षापुर्वी सुनिल गायकवाड हेच ग्रुप ग्रामपंचायत न्हावे येथिल प्रशासक होते. त्यावेळी गावात मोठ्या प्रमाणात भांडण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता पुन्हा त्यांचीच प्रशासक म्हणौन नेमणूक केली असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे गायकवाड यांना ग्रामपंचायत न्हावे येथुन प्रशासक म्हणुन त्वरीत हटवुन नविन प्रशासक दयावा व महात्मा गांधी तंटामुक्ती समिती नेमण्याकरीता व अध्यक्षाची निवड करण्यासाठी त्वरीत ग्रामसभा बोलवावी, अशी मागणी न्हावे ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी प्रशासक हटविण्याची मागणी केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडून वस्तुस्थिती अहवाल मागविण्यात येणार आहे.अहवालानंतर कायदेशीर बाबी तपासून कारवाई करणार आहे.

डॉ. भरत बास्टेवाड, मुख्यकार्यकारी अधिकारी, राजिप
Exit mobile version