रोठ बुद्रुक, खुर्द ग्रामस्थ भयभीत
| चणेरा | प्रतिनिधी |
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील प्रख्यात सोल्वे (सायस्कु) कंपनीमध्ये रविवारी (दि.21) दुपारी मोठा आवाज आल्याने कंपनीलगत असलेल्या रोठ बुद्रुक व रोठ खुर्द गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या अगदी शेजारीच ही गावे वसलेली असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोल्वे (सायस्कु) कंपनीतील स्प्रे ड्रायर प्लांटमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक प्रेशर वाढल्याने झाकण जोरात खाली आदळले. त्यामुळे रविवारी दुपारी 420ः वाजता जोरदार धमाक्याचा आवाज झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिक घाबरून गेले. घटनेबाबत माहिती घेण्यासाठी ग्रामस्थांनी कंपनीकडे चौकशी केली असता, कंपनीकडून नेहमीप्रमाणे लपवाछपवीची उत्तरे देण्यात आली. कोणतेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाहीत, अशी उत्तरे कंपनीच्या गेटवरून देण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या संदर्भात स्थानिक कार्यकर्ते सचिन मोरे यांनी प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षितता, पारदर्शकता आणि स्थानिक नागरिकांच्या संरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र झाला असून, प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतच्यावतीने आम्ही कंपनीमधील घटनास्थळी पाहणी केली. ही घटना कंपनीच्या परिसरात घडली असली तरी या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्यावतीने संबंधित कंपनीला लवकरच लेखी पत्र देण्यात येणार आहे. कंपनीमध्ये जर अशी कोणतीही घटना घडली, तर त्याची कोणतीही पूर्वकल्पना किंवा माहिती ग्रामस्थांना दिली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीमध्ये कोणती रसायने वापरली जातात, त्यांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात आणि अशा परिस्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत ग्रामस्थांना योग्य प्रशिक्षण (ट्रेनिंग) देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, कंपनीने स्वतःच्या व नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हवा, पर्यावरण व सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली गेली पाहिजे.
-नितीन वारंगे,
सरपंच, रोठ बुद्रुक
कंपनीकडून प्राथमिक माहिती घेतली असून प्रत्यक्ष कंपनीत जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी रिॲक्शन प्रक्रियेत बिघाड झाल्याने मायनर एक्सप्लोजन झाल्याची शक्यता व्यक्त केली असली, तरी प्रत्यक्ष पाहणीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
– डी.डी. तांबोळी,
कारखाना निरीक्षक






