अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार दिल्लीत
| मुंबई | प्रतिनिधी |
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार असून, मुंबईत रविवारी (दि. 4) झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, तब्बल सात दशकांनी प्रथमच मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. याचे आयोजन ‘सरहद’ या संस्थेकडून करण्यात येणार आहे.
‘सरहद’ने 2014 मध्ये पंजाबमधील घुमान येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. हे संमेलन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. तर संमेलनाचे हे तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीच्या मध्यवर्ती भागात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, आगामी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी सात ठिकाणाहून प्रस्ताव आले होते. त्यानंतर साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर संमेलनाच्या स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आगामी साहित्य संमेलन दिल्लीत आयोहलत करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात आले होते.





