ताजपुर शाळेचा आवाज घुमणार आकाशवाणीवर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील 1 ते 4 थी पर्यंतची पहिली आय.एस.ओ, आदर्श 21 पुरस्कार प्रेरित रा.जि.प. शाळा ताजपुर शाळेतील इ.3 री मधील विद्यार्थिनी जिया कैलास झावरे हिची शाळेबाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचे प्रसारण लवकरच आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून करण्यात येणार आहे. डोंगराळ ग्रामीण भागातील तालुक्यापासून 19 कि.मी अंतरावर असलेल्या ताजपुर शाळेचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळा बंद असून सुद्धा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, शिक्षण सुरू राहावे, यासाठी आयुक्त कार्यालय नागपूर व प्रथम एज्युकेशन संस्थेच्या विद्यमाने नागपूर आकाशवाणी केंद्राच्या वतीने शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम सुरू केला आहे. ताजपुर शाळेतील इ.3 री ची विद्यार्थिनी जीया कैलास झावरे, उपक्रमशील मुख्याध्यापक आदर्श शिक्षक नाना भोपी, पालक सुवर्णा झावरे, यांची शाळेबाहेरील शाळा या उपक्रमासाठी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवड केली आहे.

आतापर्यंत ताजपुर शाळेत राबवल्या जात असलेल्या उपक्रमाची दखल घेऊन कोकण विभागीय समन्वयक ऋतुजा पाटील यांनी ताजपूर शाळेची निवड केली. त्यांच्या या निवडीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गिरीश झावरे, उपाध्यक्षा पुनम झावरे, सर्व सदस्य यांनी आभार व्यक्त केले. ताजपुर शाळेची यशोगाथा आजविण्यासाठी, विविध उपक्रमाची माहिती घेण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार, गट शिक्षणअधिकारी कोकाटे, विस्तार अधिकारी पिंगळा, केंद्रप्रमुख म्हात्रे यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेट देऊन शाळेचे अभिनंदन केले. शाळेतील कौतुकास्पद उपक्रमांचा आलेख उंचावण्यासाठी शाळेच्या शिक्षिका घरत, सर्व पालकवर्ग, ताजपुर ग्रामस्थ, महिला या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मुख्याध्यापक भोपी यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version