| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे टाकलेल्या नियमबाह्य गतिरोधकांमुळे ऐन गणेशोत्सवात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना शुक्रवारी (दि.6) घडली. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, भोस्ते येथे राहणार्या सुनंदा पानवलकर ह्या गुरुवारी आपल्या नातवाला गणेशोत्सवासाठी आणायला वडवली येथे सुनेच्या घरी गेल्या होत्या. मात्र, मुलाला सुट्टी नसल्याने तो नाही आला. त्यानंतर त्या आपल्या मुलासोबत दुचाकीने परत भोस्ते येथील आपल्या घरी जात होत्या. दांडगुरी येथे आले असताना तेथील गतिरोधकामुळे पाठीमागून त्यांचा तोल गेला व डोक्याला गंभीर मार लागून बेशुद्ध झाल्या. त्यांना तात्काळ बोर्लीपंचतन येथील खासगी दवाखान्यात नेले. मात्र, अधिक उपचारासाठी इतरत्र हलविताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी वारंवार अपघाताची भीती प्रवाशांमध्ये कायम आहे. त्यामुळे येथील गतिरोधक हटवण्याची मागणी जनमासातून करण्यात येत आहे. दरम्यान, लोकांच्या मागणीनुसार आम्ही तिथे गतिरोधक बसवले होते. अपघाताची माहिती मिळताच आम्ही तातडीने रंगीत पट्टे बनवले. अधिकचे गतिरोधक आम्ही काढू, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुषार लुंगे यांनी दिली.