| उरण | वार्ताहर |
गौर म्हणजे माहेरवाशीन घरची घरची लेक, म्हणून तिच्या स्वागताला लहान-थोरांपासून सर्वच सज्ज असतात. गौरीसाठी विशेष मेजवानी असते. उरण परिसरात पूर्व, पश्चिम, महालण या भागात मोठ्या संख्येने राहणाऱ्या आगरी-कोळी-कराडी समाजातील गौरी पूजनातील विविधता दिसून येते. उरणमधील ग्रामीण भागात गौरींचा वेगळाच थाट पाहायला मिळतो.
आगरी समाजात गौरी आवाहनाच्या दिवशी जंगलात जाऊन गौरीची पत्री आणली जाते. यामध्ये तेरडा, नागवेल, गोमतीचा ताना, केवडा, माका अशा बऱ्याच वनस्पतींचा समावेश असतो. घरातील महिलावर्ग विशेषतः घरातल्या मुली गौरीची पत्री नदी जलाशय तळ्याकाठी घेऊन जातात, ही पत्री स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर तळ्याकाठी या पत्रीची पाट मांडून रांगोळी काढून व्यवस्थित पूजा केली जाते. गौरी पूजनाच्या दिवशी मात्र गौरीच्या मूर्तीची, मुखवट्याची पूजा केली जाते. तिला सुंदर पारंपरिक दागिने, साड्यांनी सजवले जाते. तिचा साजशृंगार केला जातो. गौरीला साडी, चोळी, खण-नारळ, वेणी, फणी, हळद-कुंकू, फूल-पान, अर्पण करून गौरीची ओटी भरली जाते. त्यानंतर फराळाचे पदार्थ ठेवले जातात. त्यात भूक, तहान लाडूचे प्रकार उरण परिसरात ठेवला जातो.
गौरीला फेऱ्यांच्या नृत्यातून आवाहन गौरी-गणपतीला फेऱ्यांची गाणे म्हणण्याची पद्धत उरण, पनवेल, नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरांतील गावागावांत आजही पाहायला मिळते. येथील आगरी-कोळी भूमिपुत्रांनी ही गाणी गाण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. गौरी-गणपतीसमोर एका ढोलकी वादकाला एक गोल रिंगण घालतात, तर महिला वर्ग एका सुरात पारंपरिक गाणी गात नृत्य करतात.







