। रसायनी । प्रतिनिधी ।
मोहोपाडा प्रिआ स्कूलच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना व सुप्त गुणांना वाव मिळावा. तसेच त्यांच्या अंगी स्फूर्ती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेचे क्रीडा शिक्षक व्यंकटेश थेवर, जस्वीर सिंग, प्राजक्ता शेजवळ, जयेश भाट यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर आनंद, प्रताप, संग्राम, विजय संघाच्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी मशाल हाती घेऊन क्रीडांगणाला प्रदक्षिणा घालून क्रीडा दिनाचा शुभारंभ केला.
या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक खेळामध्ये लिंबू-चमचा, दोरी उड्या, शाळेसाठी तयार व्हा, पुस्तक संतुलन, बेडूक उड्या, तसेच 50 व 100 मीटर धावण्याची स्पर्धा, बॉल बॅलन्स, डंबेल रेस, अशा विविध मजेशीर खेळांचे तसेच सांघिक खेळामध्ये डॉजबॉल, रीले, ओव्हर द हेड आणि पासिंग द बॉल अंडर द थाय इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली खेळाडूवृत्ती, चपळता व उत्साह दाखवून दिला. क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी, शिस्त व संघभावना निर्माण झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. क्रीडा दिनामुळे शाळेचे वातावरण आनंदी व उत्साहपूर्ण झाले होते. अशा प्रकारे प्रिआ शाळेत क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या.






