उपअभियंत्यासह कर्मचार्‍यांना ठेवले कोंडून

9 जणांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| रायगड | वार्ताहर |

पेण तालुक्यातील 38 गावातील पाणी प्रश्‍न चांगलाच पेटला आहे. ठरलेल्या मुदतीमध्ये पाणी देण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असमर्थ ठरल्याने येथील पेण खारेपाट विकास संघटना आक्रमक झाली. त्यांनी थेट शाखा अभियंता एकनाथ कोठेकर यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. तब्बल साडेसात तास अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना कोंडून ठेवण्यात आले. पोलीस आणि नायब तहसिलदार यांच्या मध्यस्थीने सर्वांची रात्री अकरा वाजता सुटका करण्यात आली. याप्रकरणी पेण खारेपाट विकास संघटनेच्या नऊ जणांविरोधात पेण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमातून खारेपाट विभागातील 38 गावांना पाणीपुरवठा करण्याचे काम सुरु आहे. गेल्या कित्येक वर्षापासून येथील पाण्याचा प्रश्‍न सुटलेला नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाणी प्रश्‍न सुटावा यासाठी विविध आंदोलने, मोर्चे काढण्यात आले आहेत. मात्र पाण्याचा अद्याप पत्ता नसल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी मंगळवारी थेट उपअभियंता एकनाथ कोठेकर यांच्या कार्यालयावर धडक दिली. वाशी येथे उंच पाण्याची टाकी भरण्याबाबत उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी 25 डिसेंबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन कार्यालयाने दिले होते. याची आठवण कोठेकर यांना विकास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करुन दिली. मात्र, आधीच ठेकेदाराने पाईपलाईनचे काम केले होते.

पण त्या पाईपलाईनला गळती लागल्याने आश्‍वासनाची पूर्तता झाली नसल्याचे कोठेकर यांनी संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. दुपारी साडेतीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोठेकर यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांना कोंडून ठेवण्यात आले. कोठेकर यांनी याची माहिती वरिष्ठ कार्यकारी अभियंता नागदे यांना झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तेथे पोलीस आणि नायब तहसिलदार परदेशी तेथे पोचले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर रात्री अकरा वाजता टाळे उघडून सर्वांची सुटका करण्यात आली.

Exit mobile version