बॅट, स्टम्पचे मैदानात पुजन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हयामध्ये क्रिकेट हा खेळ सर्वांच्याच पसंतीचा आहे. दसर्याच्या मुहूर्तावर शनिवारी (दि.12) या खेळाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येऊन क्रिकेटच्या मैदानात जाऊन पुजन करून या खेळाला सुरुवात केली.
रायगड जिल्ह्यात विशेष म्हणजे ग्रामीण भागात क्रिकेटला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा पावसाळ्यानंतर गावागावात सुरू केल्या जातात. ग्रामपंचायत चषकपासून गावातील क्रिकेट मंडळामार्फत शनिवार व रविवारी क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जातात. मार्च महिन्यापर्यंत हा खेळ जिल्ह्यात ठिकठिकाणच्या मैदानात खेळला जातो. यानंतर पावसाळा संपल्यावर भात कापणीची कामे संपल्यावर शेत मोकळी झाल्यावर दिवाळीनंतर हा क्रिकेटचा हंगाम सुरू होतो. क्रिकेट स्पर्धेसाठी लाखोंचे बक्षीस लावले जाते. गावातील तरुण मंडळी या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या संघासाठी यश मिळविण्याचा प्रयत्न करतात.
मार्चनंतर जून ते सप्टेंबर पावसाचा हंगाम सुरु झाला. यामुळे क्रिकेट खेळाला काही महिने ब्रेक लागला होता. पावसाळा कधी संपतो. तसेच, भात कापणीची कामे कधी पुर्ण होतात याकडे तरुणांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपण्याच्या मार्गावर आहे. लवकरच पाऊस थांबणार असून भात लावणीची कामेदेखील सुरु होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ही कामे पुर्ण होणार आहेत. यानंतर शेत, मैदाने मोकळे होणार आहे. मैदानात वाढलेले गवतदेखील सुकण्याच्या मार्गावर असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुणांचे वेध आता क्रिकेट खेळावर राहिले आहे. दसर्याच्या मुहूर्तावर शनिवारी जिल्ह्यातील अनेक गावांतील तरुणांनी तसेच क्रिकेट असोसिएशनने पुढाकार घेत क्रिकेट खेळाचा शुभारंभ केला आहे. बॅट, स्टंम्पचे मैदानात पुजन करून क्रिकेट खेळाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात लवकरच ठिकठिकाणी क्रिकेटचा खेळ रंगताना दिसणार आहे.
क्रिकेट हा खेळ आवडीचा आहे. खेळातून एक वेगळा उत्साह व उर्जा निर्माण होते. क्रिकेट खेळताना आपल्या संघाला जिंकून देण्याची एक जिद्द असते. शनिवारी दसर्याच्या निमित्ताने या खेळाचा शुभारंभ मैदानात करण्यात आला. गावातील तरुणांचादेखील यामध्ये मोलाचा सहभाग राहिला आहे. मैदानात वाढलेले गवत काढून लवकरच है मैदान खेळासाठी मोकळे केले जाणार आहे.
– संजय पारंगे, क्रिकेटप्रेमी







