| मुंबई | प्रतिनिधी |
शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. मात्र, या मैदानात दरवर्षी रामलिला होत असते. दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी रावण दहन केलं जातं. मात्र, शिंदे गटाचा मेळावा असल्याने दसऱ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीलाच रावण दहन आटोपून घ्या, असं फर्मानच राज्य सरकारने रामलिला आयोजित करणाऱ्यांना बजावलं आहे. त्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. सरकारला प्रभू राम केवळ मतांसाठीच हवे आहेत काय? असा संतप्त सवाल काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. सरकारच्या या निर्णयावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच हा निर्णय मागे घ्या, नाही तर परिणामांना सामोरे जा, असा इशाराच वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर सरकारने फर्मान मागे घेतलं नाही तर काँग्रेसकडून उग्र आंदोलन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कला मंडळाकडून गेल्या 48 वर्षापासून आझाद मैदानात रामलीला आयोजित केली जाते. दहा दिवस या ठिकाणी मोठा जल्लोष असतो. या ठिकाणी रोज रामायण नाटक दाखवलं जातं. पोथी पठण होतं. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी रावण दहन केलं जातं. गेल्या 48 वर्षापासून ही परंपरा आहे. पण शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी राज्य सरकारने ही परंपरा मोडित काढण्याचं फर्मानच काढलं आहे. दसऱ्याच्या आदल्या दिवशी रावण दहन करा किंवा रामलीला दुसऱ्या मैदानात घ्या, असं मंडळाला सांगितलं आहे. त्यावर वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. तसंच लाखो लोकांच्या श्रद्धेचा अनादर आहे. रामलीला जिथे सुरू होते, तिथेच रावण वध होणं अपेक्षित असतं. मात्र या सरकारने सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवत रावण वध आदल्या दिवशी करा, असा चमत्कारिक सल्ला दिला आहे. भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्यांना हे शोभत नाही, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली आहे. सरकारने आपला हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा लोक आंदोलन करतील आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल, असा इशाराही त्यांनी दिला.