। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
वेगवान वार्यासह पडलेल्या पावसामुळे विजेचे खांब, वीजवाहिन्या पडून गणपतीपुळे, जाकादेवी, मालगुंड, खंडाळा, जयगड व आजुबाजूच्या गावांतील सुमारे 18 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या 40 कामगारांना चार दिवस अथक परिश्रम करावे लागले. ऐन पर्यटन हंगामात वीज खंडित राहिल्यामुळे गणपतीपुळे, मालगुंड येथील व्यावसायिकांनाही तोटा सहन करावा लागला.
31 ऑक्टोबरला 220 केव्ही वाहिनीसह निवळी उपकेंद्र येथून जाणारी 33/11 केव्ही चाफे व खंडाळा उपकेंद्र यांना जोडणार्या वाहिनीचे दहा खांब पडले होते. त्यामुळे गणपतीपुळे, जाकादेवी, मालगुंड, खंडाळा, जयगड व आजुबाजूच्या गावांतील सुमारे 18 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. 1 नोव्हेंबरला सायंकाळी वादळ आणि पाऊस थांबल्यानंतर महावितरणकडून दुरुस्तीला सुरवात झाली. सायंकाळपर्यंत दोन खांब उभे करून वाहकताराही जोडण्यात आल्या. सायंकाळी विजांसह झालेल्या जोरदार पावसामुळे आणि अंधारामुळे नाइलाजाने हे काम थांबवावे लागले. उर्वरित आठ खांबांच्या वाहकतारा दरीच्या बाजूला झाडांमध्ये अडकल्या असल्यामुळे महावितरणच्या पथकांकडून काम थांबवण्यात आले. काळोखामुळे कार्यवाही करणे शक्य नव्हते. 2 नोव्हेंबरला उर्वरित काम पूर्ण करण्यात आले आणि वाहिनी भारित करण्यात आली; मात्र हे काम करताना कोतवडे शाखा कार्यालय परिसरातही 2 उच्चदाब विजेचे खांब आणि 3 लघुदाब विजेचे खांब, मालगुंड शाखा कार्यालय परिसरातील 7 लघुदाबाचे, जाकादेवी शाखा कार्यालय परिसरातील 2 लघुदाबाचे खांब पडले होते. हे काम करण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
दरम्यान, या कामासाठी खंडाळा उपकेंद्रातील 3 सेक्शनचे 20 कर्मचारी, रत्नागिरीतील दोन ठेकेदारांची पथकं आणि लांजा येथील एक पथक असे मिळून 40 कामगार चार दिवस अथक परिश्रम करित होते. दिवाळीची सुटी असल्यामुळे कामगारांची कमतरता होती. तरीही महावितरणच्या कर्मचार्यांनी या परिस्थितीवर मात करत वीजपुरवठा सुरळीत केला; मात्र याचा फटका ऐन दिवाळीत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसह व्यावसायिकांना बसला.