नेरळमधील नाले अद्याप झुडुपांच्या विळख्यात

ग्रामपंचायतीच्या नालेसफाईवर प्रश्‍नचिन्ह
। नेरळ । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणार्‍या नेरळ ग्रामपंचायतीमधील नालेसफाईबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाली आहेत. नेरळ ग्रामपंचायतीने मे महिन्यात ग्रामपंचायत हद्दीमधील नाल्यांची साफसफाई केली होती. मात्र, पावसाळ्याच्या आधी हे चित्र दिसून आले आहे.
नेरळ या आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रुपग्राम पंचायत मध्ये नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ताईत नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधून तीन मोठे नाले हे सांडपाणी वाहून नेत असतात. सांडपाणी वाहून नेणारे ते नाले असल्याने त्या नाल्यांमध्ये झाडेझुडपे हे दरवर्षी वाढत असतात. त्या सर्व झाडाझुडपांनी बाहेर काढण्याची जबाबदारी नेरळ ग्रामपंचायत पावसाळा सुरू होण्यापूर्वी करीत असते. त्याप्रमाणे यावर्षीदेखील नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने मे महिन्यात नाल्यांमधील कचरासफाई केली होती. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायतीकडून प्रशासनाचे प्रमुख ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांनी नालेसफाई सुरु आहे, असे जाहीर केले होते.
मात्र आजही नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील नाल्यांची साफसफाई नेमलेल्या ठेकेदराने केलेली नाही, असे दिसून येत आहे. नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरणापासून पोलीस ठाण्याच्या बाजूने टॅक्सी स्टॅन्ड भागात येणार नाला आजदेखील झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. तर कोतवाल वाडीच्या मागील बाजूने येणारा आणि खांडा गावातून टॅक्सी स्टॅन्डकडे नाला आजही झाडाझुडपांनी व्यापला आहे. त्याचवेळी मातोश्री नगर भागातून एसटी स्टॅन्डकडे येणार्‍या नाल्याचीदेखील सफाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतचे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीने नालेसफाईवर किती खर्च केला आहे, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. नालेसफाईवर केलेला खर्च वायफळ खर्च झाला आहे, असे बोलले जात आहे.

आम्ही ग्रामपंचायतीकडून काही ठिकाणी जेसीबी मशीनच्या सहाय्याने तर काही मजूर यांच्या माध्यमातून नालेसफाई केली असून, ती पूर्णपणे 100 टक्के झालेली नाही. तसेच त्या कामाचे कोणतेही बिल अदा करण्यात आलेले नाही.

गणेश गायकर, ग्राम विकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत

Exit mobile version