| चौल | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी चित्रलेखा पाटील यांच्यामागे प्रचंड ताकद उभी केली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. रविवारी चौल विभागात चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी चौल शहराची ग्रामदेवता शितळादेवी मंदिरात श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी चौलवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसादाची दाद दिल्याने चौलवासीय महाविकास आघाडीच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरेंद्रदादांचा हात मोलाचा
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक यांनीही उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सुरेंद्र म्हात्रे यांनी हात दिल्याने चौलमधून मोठे मताधिक्य मिळणार याची खात्री आहे, असा विश्वास द्वारकानाथ नाईक (कबन अण्णा) यांनी व्यक्त केला. मतदारांच्या घराघरापर्यंत पोहोचून त्यांना आपला उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई आणि निशाणी शिट्टी असल्याचे सांगा. चित्रलेखा पाटील उच्चशिक्षित उमेदवार असून, त्यांना आमदार बनवून विधानसभेत पाठवायचे आहे. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ असो, कोरोना काळ असो वा पूरपरिस्थिती असो. या संपूर्ण आपत्तीच्या काळात चित्रलेखा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत अडीअडचणीत असलेल्या प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने हात दिला आहे. प्रत्येकाच्या मदतीला त्या धावून आल्या आहेत. त्यांनी केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवा. आपल्याला विकास करायचा असेल, तर चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताईंना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे आवश्यक आहे. तशी रणनीती आखून पुढील आठ दिवस झोकून देऊन काम करा, असे आवाहनही द्वारकानाथ नाईक (कबन अण्णा) यांनी केले.
शितळादेवीच्या आशीर्वादाने प्रचारास प्रारंभ
भक्तांच्या नवसाला पावणाी, हाकेला धावणारी अशी ख्याती असणारी चौल नगरीची ग्रामदेवता आई शितळादेवीचे आशीर्वाद घेऊन तिची खणा-नारळाने ओटी भरुन महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताईंच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कोणतेही शुभ कार्य असो वा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ असो. आई शितळादेवीला नारळ वाढविण्याची परंपरा आजतागायत कायम असल्याची आठवण द्वारकानाथ नाईक यांनी करुन दिली. यावेळी चित्रलेखा पाटील यांच्या विजयासाठी सर्वांनी मिळून आई शितळादेवीला गार्हाणे घातले.
शिट्टीच्या आवाजाने परिसर दणाणला
महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांना शिट्टी चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आजच्या प्रचारादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी शिट्टी वाजवून चौल परिसर दणाणून सोडला होता. यावेळी ङ्गजय शिवाजी, जय भवानीफ, लाल बावटे की जय, महाविकास आघाडीचा विजय असो आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर भारावून टाकला होता.
गद्दाराला चिखलात लोळवा: म्हात्रे
प्रचार सभेच्या नियोजनासाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनेशी गद्दारी करणार्या आमदाराला आता चिखलात लोळवण्याची हीच वेळ आहे. कारण, महेंद्र दळवी यांना आमदार करण्यात सर्व शिवसैनिकांची मेहनत आहे. परंतु, या माणसाने त्याची किंमत ठेवली नाही. गद्दारी करुन शिंदेच्या गटात सामील झाले. अशा माणसावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही. आपला संताप मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करा, असेही सुरेेंद्र म्हात्रेंनी सांगितले. या बैठकीला शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मळेकर, चौलचे माजी सरपंच भाई मळेकर, माजी सरपंच मधुकर फुंडे, श्री. खोत, शरद वरसोलकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदला घ्यायचाय : ठाकूर
विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी शिवसेनेशी गद्दारी करुन शिवसेना फोडण्याचे काम केले आहे. तसेच ज्यावेळी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला, त्यावेळी याच आमदाराने चिखळात लोळून आनंद साजरा केला. राजकारणात जय-पराजय होत असतो. परंतु, आमदार आणि त्याच्या बगलबच्चांनी केलेल्या नीच कृत्याबद्दल त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. या दोन्ही गोष्टींचा बदला घ्यायचा आहे, त्यासाठी पेटून उठा, असा संताप राजेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला. हीच भावना उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याची असल्याने सर्वांनी आमदारांच्या कृत्याचा निषेध केला. तसेच ङ्गसुरेंद्र दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैफच्या घोषणा दिल्या.