सहाव्या दिवशी संप सुरूच

| कोर्लई | वार्ताहर |
शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला आज सहावा दिवस असून, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी ठाम आहेत. विलिनीकरण मुद्द्यावर संपात सामील कामगारांवर दबाव आणला जात असल्याबद्दल मुरुडच्या एसटी कर्मचार्‍यांच्या वतीने आगारप्रमुखांना निवेदन सादर करण्यात येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही शांततेत व अहिंसेच्या मार्गाने संप करीत असल्याचे व सहकार्याचे आवाहन कर्मचार्‍यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले असून, सदर निवेदनाच्या प्रती मुरुड तहसीलदार, पोलीस निरीक्षक व विभाग नियंत्रक रायगड-पेण यांना देण्यात आल्या आहेत. मुरुडमधील 180 कर्मचारी शासनात विलिनीकरण मुद्द्यावर संपात सहभागी झाले आहेत. संपकरी कर्मचार्‍यांपैकी सर्वांवर कारवाई न करता तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याबद्दल अर्थपूर्णरित्या संशय व्यक्त केला जात आहे. आंदोलनात सहभागी सर्व कर्मचार्‍यांचे निलंबन करण्याबाबतही आज कर्मचार्‍यांच्या वतीने आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब, कामगार आयुक्त व राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक-पेण यांना निवेदन देण्यात आले आहे.

Exit mobile version