| मुंबई | प्रतिनिधी ।
राज्यातील अंगणवाडी सेविकांचा गेल्या 52 दिवसांपासून संप सुरू होता. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी संप पुकारला होता. हा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध संघटनेचे शिष्टमंडळ, प्रतिनिधी यांच्या सोबत सरकारने अनेक बैठका घेऊन यावर तोडगा काढला.
दरम्यान, झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन लागू करण्याकरिता संघटनांकडून अभिप्राय घ्यावेत. सदर अभिप्राय व बँकांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा एकत्रित अभ्यास करून एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांनी तातडीने प्रस्ताव सादर करून वित्त व नियोजन विभागाकडे पाठवावा. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देण्याबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडून प्राप्त प्रस्तावावर विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन वित्त व नियोजन विभागाकडे पाठविण्यात यावा, असे निर्देश सरकारने दिले आहेत.





