तिसर्‍या आघाडीची मांडणी

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि या दोन दिग्गज नेत्यांच्या चर्चेत राष्ट्रीय स्तरावर सामूहिक नेतृत्व निर्माण करण्याची गरज कशी आहे, यावर चर्चा झाली. देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर देशातील परिस्थिती बदलण्यासाठीचा सगळा भर असून सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस आपला राष्ट्रीय ठसा उमटवत असून त्यादृष्टीनेही या बैठकीला महत्त्व आहे. शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या पक्ष सहकार्‍यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी दीर्घ गप्पा आणि चर्चा झाल्या. त्यात आजच्या परिस्थितीत समविचारी शक्तींनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व कसे उभे करणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला आणि त्यांच्या भेटीचा तोच हेतू होता असे त्यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रकारच्या डावपेचांना धूळ चारुन त्यांना पराभूत करुन पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर त्यांचे स्थळ अधिक बळकट बनले आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपला टक्कर देण्याची त्यांची तयारी पाहून सगळे विरोधी पक्ष त्यांच्या भोवती उभे राहतील असे चित्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर त्या आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी दमदार पावले उचलत असून मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह 12 काँग्रेस आमदारांनी तृणमूलमध्ये पक्षांतर केले आहे. अन्य अनेक नेते अलिकडेच तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. तसेच, गोव्यातील येत्या विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी तेथे आपल्या पक्षाला मजबूतपणे उतरण्यासाठी तयार केले आहे. त्यांनी प्रामुख्याने काँग्रेसमधील नेते फोडले आहेत. अर्थात गोव्यातील राजकारण पाहता तेथे कोण मूळ काँग्रेसचा आणि कोण मूळ भाजपचा हे सांगणे कठीण असते. तरी काही महिन्यांत तेथे एक महत्त्वाचा सत्तेसाठीचा स्पर्धक म्हणून पक्षाला उभे करण्याचे अवघड काम त्यांनी केले आहे. तिसरी आघाडी हा काही नवीन विचार नाही. गेल्या तीन दशकांतील राजकारण हे अशाच आघाड्यांचे होते हे आपण पाहिले आहेच. त्यात पंतप्रधानपदही प्राप्त झाले आहे. बिगर भाजप, बिगर काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान झालेलेही देशाने पाहिले आहेत. आता या तिसर्‍या आघाडीत प्रश्‍न आहे तो काँग्रेसचा. ममता बॅनर्जी यांच्या मते यूपीए ही संयुक्त आघाडी आता अस्तित्वात नाही. त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. निम्मा काळ परदेशी घालवून इथले राजकारण करता येत नाही, असे त्यांचे मत आहे आणि त्यात तथ्य आहे. ममता स्वत: अशा प्रकारे रस्त्यावर उतरून खेला होबे करणार्‍या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांचा याबाबतचा स्पष्टोक्तेपणा कायम पाहिला गेला आहे. शरद पवार यांची याविषयीची भूमिका थोडी वेगळी आहे. पवारांना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि मराठी माणसाने देशाचे पंतप्रधानपद भूषवावे असे महाराष्ट्रातील जनतेलाही वाटते. तसे करण्याची क्षमता असलेले पवार हेच सध्यातरी एकमेव नेते आहेत आणि आता तशी संधीही या तिसर्‍या आघाडीतून दिसते. त्यांना वाटते की ज्यांना या भाजपविरोधी आघाडीत सहभागी व्हायचे आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे, अशा सर्वांना सोबत घेऊन काम करायला हवे. काँग्रेस या भाजपाविरुद्धच्या आघाडीचा भाग असेल का, असे विचारले असता पवार यांनी भाजपा विरोधात असलेला कोणताही पक्ष एकत्र आला तर त्याचे स्वागत आहे, असे उत्तर दिले आहे. बॅनर्जी यांच्या मते आधीच्या सरकारच्या वेळी स्थापन झालेली युपीए आता अस्तित्वात नसल्याने आपणच एक पर्यायी आघाडी उभी करायला हवी. काँग्रेसला आता आपल्याविना अडणार नाही हे लक्षात घेऊन कालानुरूप भूमिका घ्यायला हवी. कारण काँग्रेस नसेल तर ती आघाडी कमकुवत होऊ शकते आणि त्याचा फायदा भाजपालाच होऊ शकतो. ते टाळायला हवे. काँग्रेस कायम नेतृत्वाच्या स्थानी राहिली, त्यामुळे त्याला आपले स्थान ढळमळताना दिसत आहे. मात्र सगळ्या गोष्टी काळाच्या ओघापुढे बदलतात, हे त्यांनी पाहायला हवे आणि या आघाडीत सर्व शक्तीनिशी उतरायला हवे. तिसरी आघाडी हा सध्या तरी सक्षम पर्याय आहे.

Exit mobile version