आंदोलन तुर्तास स्थगित -कॉ.अशोक ढवळे
जन आंदोलन संघर्ष समितीची माहिती
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
संसदेत शेतीविषयक कायदे रद्द केल्यानंतर, किमान आधारभूत किंमत, आंदोलनादरम्यान शेतकर्यांवरील खटले मागे घेणे, आंदोलनात शहीद झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे पत्र केंद्र सरकारने दिले आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता होते की नाही यावर समितीचे पूर्ण लक्ष राहणार आहे. शेतकर्यांच्या मागण्या केवळ कागदोपत्री मान्य केल्या असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे; मात्र कायमचे संपलेले नाही, असे प्रतिपादन कॉ.अशोक ढवळे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, कॉ. सुकुमार दामले, कॉ. नामदेव गावडे व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे उपस्थित होत्या.
संयुक्त किसान मोर्चाचा ऐतिहासिक विजय, जन आंदेालन संघर्ष समितीचे योगदान, महाराष्ट्रातील पुढील कार्यक्रम व आंदोलनाची पुढील वाटचाल काय असेल या विषयावर कॉ. अशोक ढवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी आंदोलनाने देशाला वाचवले. जर तीन काळे कायदे लागू झाले असते तर किमान आधारभूत किंमत संपुष्टात आली असती. शेती बाजारचे औद्योगीकरण झाले असते. बाजार समित्यांची व्यवस्था मोडकळीस आली असती. मात्र शेतकर्यांनी केंद्र सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे देश वाचला. हा ऐतिहासिक विजय असून भविष्यात जन आंदोलन संघर्ष समिती अजून बळकट करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
15 जानेवारी 2022 रोजी किमान आधारभूत किंमत, शेतकर्यांवरील खटले, शहीद झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आदी प्रलंबित मागण्यावर पाठपुरावा करुन चर्चा करण्यासाठी जन आंदोलन संघर्ष समिती बैठक घेणार आहे.
कॉ.अशोक ढवळे
शिक्षण व निवारा, आरोग्य व महिलांचे प्रश्न, जमिन अधिग्रहणाबाबत फडणवीस सरकारच्या काळातील जुलमी कायद्यात बदल, शेत मालाला किमान आधारभूत भाव मिळणे आदी विषयांबाबत आंदोलन करण्याचा निर्धार समितीने केला आहे. यावेळी कॉ. सुकुमार दामले, कॉ. नामदेव गावडे व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी देखील आपली मते मांडली.
शेवटी अहिंसेचाच विजय
तीन काळे शेती कायदे रद्द करणे हा शेतकरी आणि कामगारांचा मोठा विजय आहे. जनआंदोलनाने असंवेदनशील अहंकारी सरकार झुकवू शकते हे सिद्ध झाले. अहिंसा नेहमीच हिंसेला हरवू शकते हे देखील सिद्ध झाले आहे. कारण आंदोलन रोखण्यासाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर हिंसा वापरण्यात आली होती. पण शेवटी विजय अहिंसेचाच होतो, हे शेतकर्यांनी दाखवून दिले. लढा इथे संपलेला नाही. हमी भाव, खासगीकरण, कामगार कायद्यांचा मुद्दा आदी विषयांवर जनआंदोलन होत राहील,असे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यानी जाहीर केले.