शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

। पेण । प्रतिनिधी ।

पेण येथील कारमेल हायस्कूलमध्ये माणूसकीला काळीमा फासेल असा प्रकार शिक्षिका रसिका साळवी यांच्याकडून घडला आहे. इयत्ता चौथीमध्ये शिकत असणारा विद्यार्थी स्पर्धेत भाग घेत नाही, म्हणून त्याला प्लास्टिकच्या पाईपने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, कारमेल हायस्कूलमध्ये वार्षिक क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये वैयक्तिक स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये पिडीत विद्यार्थ्याने सहभाग घेतला नाही, म्हणून क्रिडाशिक्षिका रसिका साळवी यांनी या विद्यार्थ्याला प्लास्टिकच्या पाईपने हातावर, पायावर, पाठीवर तसेच पार्श्‍वभागावर अमानुषपणे मारले. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी गेला. शिक्षिकेच्या मारायच्या भितीने त्याने आपल्या पालकांना काहीच सांगितले नाही. दुसर्‍या दिवशी विद्यार्थी शाळेमध्ये गेला नाही, कारण त्याने माराचा मानसिक धक्का घेतला होता. तरीही त्याने आपल्या पालकांना काहीच सांगितले नाही. परंतु पिडीत विद्यार्थ्याचे वडील त्याला तिसर्‍या दिवशी आंघोळीला घेऊन गेले असता त्यांच्या लक्षात आले की, आपल्या मुलाच्या अंगावर मारायचे वळ (डाग) आहेत. तेव्हा मात्र पिडीत विद्यार्थ्याचे वडील व आई यांनी कारमेल हायस्कूल गाठले. महत्त्वाची बाब म्हणजे पिडीत विद्यार्थ्याची आईसुध्दा एक शिक्षिका आहे. त्यामुळे तिला माहित आहे की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कसे वागायचे, कसे बोलायचे. मात्र आपल्या मुलाच्या शरिरावरील मारण्याच्या खुणा पाहुन पिडीत विद्यार्थ्यांची आई अवाक झाली. हे सर्व होऊनही कारमेल हायस्कूल प्रशासन आरेरावी करण्यात कमी पडली नाही. पिडीत मुलाच्या आई-वडिलांवर दबाव टाकण्यासाठी काही राजकीय मंडळींना प्राचारण केले. तेव्हा मात्र पिडीत विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी रौद्ररूप दाखवले. तेव्हा राजकीय मंडळींनीदेखील काढता पाय घेतला.

पिडीत विद्यार्थ्याचे वडील हे मोठे उद्योजक असून आई शिक्षिका आहे तर आजोबा हे एके काळचे पेण तालुक्यातील राजकारणातील बडे नेते म्हणून ओळखले जायचे. ही सर्व पार्श्‍वभूमी पाहिल्यावर राजकीय मंडळींना शाळेच्या बाजूंनी धावत येणे महागात पडेल, याची जाणीव झाली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्व प्रकार पोलीस ठाण्यात नेला. तेव्हा पोलीस निरिक्षक संदीप बागूल यांनी दोन्ही बाजू ऐकून पिडीत मुलाच्या पालकांना सांगितले की, आपण ज्याप्रमाणे निर्णय घेणार त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करू. अखेर पिडीत मुलाच्या आई-वडिलांनी माणूसकी दाखवित शिक्षिकेकडून माफीनामा लिहून घेतला आणि प्रकरण मिटविले.

Exit mobile version