मुंबईचा गुजरातवर दणदणीत विजय
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात पार पडलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या झंझावातील शतकाच्या जोरावर मुंबईने मोठा विजय साकारला. मुंबईने गुजरातचा 27 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयाने मुंबईने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवत प्ले ऑफसाठी दावेदारी प्रबळ केली. सूर्यकुमारचे झंझावाती शतक, आकाश मधवाल आणि पियुष चावलाची कमाल करणारी गोलंदाजी मंबईच्या या विजयाचे वैशिष्ट्यं ठरली.
सूर्यकुमारने अवघ्या 49 चेंडूत त्याने नाबाद 103 धावांची तडाखेबाज खेळी साकारली. त्यामुळे मुंबईने 5 बाद 218 अशी भक्कम धावसंख्या उभारली. सूर्यकुमारच्या या खेळीला गोलंदाजांनी चार चाँद लावले. पहिल्या षटकापासून गुजरातचा एकेक मोहरा बाद करण्यास सुरुवात केली. सरुरवातीला मधवान आणि बेरेडाँफ यांचा प्रभाव इतका होता की गतविजेत्यांनी निम्मा संघ 55 धावांत गमावला होता. आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवणार्या चावलाने धोकादायक तेवटियाचीही विकेट काढली. तर, दुसर्या हप्त्यात मधवालने मिलरचा अडसर दूर केला. मुंबईला मोठा विजय मिळवण्याची संधी होती, परंतु राशीद खानने 79 धावांची खेळी करून गुजरातच्या पराभवाचे अंतर कमी केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी मिळालेल्या मुंबईला कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी दहा धावांच्या सरासरीने 61 धावांची सलामी दिली. मुंबईची अवस्था 3 बाद 88 अशी झाली. सूर्यकुमार यादव एका बाजूने डाव सावरत होता आणि वेगही कायम ठेवून होता. प्रथमच खेळण्याची संधी मिळालेल्या विष्णू विनोदने आपली निवड सार्थ ठरवताना 20 चेंडूत 30 धावा फटकावल्या. मुंबईचा संघ द्विशतकी मजल मारणार हे निश्चित होते, पण अखेरच्या दोन षटकांत सूर्याची बॅट आग ओकायला लागली आणि मुंबईने उभाललेल्या 218 धावा या गुजरातविरुद्ध सर्वाधिक ठरल्या.