झुलता पूल निधीअभावी लटकला

महाविकास आघाडीच्या निधीला महायुतीची कात्री

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील पर्यटनासाठी विशेष निधीची तरतूद महाविकास आघाडी सरकारने केली असताना नव्याने प्रस्थापित झालेल्या महायुती सरकारने या निधीला कात्री लावल्याने या पर्यटन स्थळांचा विकास अधांतरीच लटकला आहे.

पोलादपूरच्या वर्षा पर्यटनाचे विशेष आकर्षण असलेला वाकण गोपाळवाडी ते घागरकोंड येथील झुलता पूल 2021 मध्ये अतिवृष्टीदरम्यान वाहून गेला. परिणामी, वर्षापर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पोलादपूर तालुक्यात गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही वर्षापर्यटनासाठी गर्दी होण्याची शक्यता घटली आहे. झुलत्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी महायुती सरकारमध्ये असलेल्या मंत्री अदिती तटकरे आणि आ. गोगावले यांनी पुन्हा पर्यटन विशेष निधी उपलब्ध करून झुलत्या पुलाच्या लटकलेल्या प्रस्तावावर एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

पोलादपूर तालुक्यातील निसर्ग सौंदर्यसृष्टीचा 2021च्या अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलनामध्ये र्‍हास झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विविध पर्यटन स्थळांच्या विकासकामासाठी पर्यटन विभागातर्फे तब्बल 10 कोटी रूपयांचा विकासनिधी आगामी काळात खर्च करण्यास मंजुरी मिळाली. या निधीतून घागरकोंडचा झुलतापूल, साखर येथील नरवीर सुर्याजी मालुसरे समाधी आणि उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे सुशोभिकरण आदी पर्यटनविकास करण्याची तयारी सुरू झाली. यानंतर ब्रिटिशकालीन हिलस्टेशन कुडपणच्या विकासासाठी तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दौरा केला. मात्र, तत्कालीन खासदार गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीतील सभेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कुडपणला घेऊन जाण्याची घोषणा स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी करून प्रत्यक्षात ती घोषणा कृतीत आणण्याऐवजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागेल, अशी तयारी केली. यानंतर शिवसेना-भाजप युती सरकार अस्तित्वात आले आणि आ. गोगावले यांना मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेमुळे पोलादपूरच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, तत्पूर्वीच माजी राज्यमंत्री अदिती तटकरे यांचादेखील युती सरकारमध्ये समावेश होऊन त्यांना मंत्रीपद मिळाल्याने आ. गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे हे दोघेही महायुती सरकारमध्ये महत्त्वाच्या स्थानावर असल्याने पोलादपूरकरांना पुन्हा पर्यटन विकासासाठी भरघोस निधी मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या नेतेद्वयींनी एकजुटीने पाठपुरावा करून घागरकोंडच्या झुलत्या पुलाची पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घेण्याची गरज आहे.

पोलादपूर तालुक्यातील वाकण गोपाळवाडी येथील घागरकोंडकडे जाणार्‍या रस्त्यावरील 2016 मध्ये लोहरज्जू तुटल्याने नादुरूस्त झालेल्या झुलता पुलाची 2018 मध्ये दुरूस्ती केल्यानंतर 2021 मध्ये हा झुलता पूल पूर्णपणे वाहून गेला. तत्पूर्वी, 2017 मध्ये झुलत्या पुलाजवळून वाहून गेलेल्या हर्ष मुरडे या लहान बालकाचा मृतदेह तब्बल 11 दिवसांनंतर वाकण गावाच्या हद्दीत अंधारीचा डोहात आढळून आला होता. हा झुलता पूल पुन्हा उभारण्याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने तत्कालीन राज्यमंत्री अदिती तटकरे यांना आवाहन केल्यानंतर निधी उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली होती.

सद्यःस्थितीत पोलादपूर तालुक्यातील झुलता पुलाच्या ठिकाणी केवळ दोन चौथरे असून, कोणतेही अन्य अवशेष दिसून येत नाहीत. परिणामी, पुलाकडे जाणार्‍या रस्त्यावरून महसुली कर्मचार्‍यांच्या मेहेरबानीवर चालणार्‍या वीटभट्ट्यांतील विटांची वाहतूक करणार्‍या डम्पर्सची ये-जा यंदाच्या मे महिन्याअखेरपर्यंत सातत्याने सुरू होती. यामुळे नजीकच्या काळात याठिकाणी पुन्हा झुलता पूल उभारण्यात न आल्यास अवैध उद्योगांना या परिसरामध्ये चालना मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.

Exit mobile version