। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
पावसाळा सुरू झाला की बाजारात टपोर्या दाण्यांच्या डाळिंबाच्या राशी लागण्यास सुरुवात होते. अगदी रस्त्यांच्या कडेला डाळिंबाचे विक्रेते ढीग लावून डाळिंब विकताना दिसू लागतात. त्यापाठोपाठ टपोर्या डोळ्यांची सीताफळेही बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागतात. मात्र यावर्षी पावसाच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका या दोन्ही पावसाळी फळांना बसला आहे. त्यामुळे बाजारात या फळांची आवक कमी झाली असून दरही वाढले आहेत. महाराष्ट्रातून डाळिंब कमी येत असल्याने गुजरातवरूनही डाळिंब येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, गुजरातची ही डाळिंबे आतून सफेद असल्याने त्यांना उठाव नसल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
या फळांच्या रोपांना जेव्हा पाऊस हवा होता, तेव्हा तो पडला नाही, अन् जेव्हा पाऊस नको होता, तेव्हा जोरदार कोसळल्याने झाडांना लागलेली फुले मोठ्या प्रमाणात गळून गेली. परिणामी, उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारात या दोन्ही फळांची आवक कमी होत आहे. यावर्षी यापुढेही आवक कमीच राहणार असल्याचा अंदाज व्यापार्यांनी वर्तवला आहे. त्याचाच परिणाम फळांच्या दरांवर पाहायला मिळत आहे.
बाजारात संगमनेर, पंढरपूर, सांगोला, सोलापूर, श्रीगोंदा, फलटण आणि जेजुरीमधून डाळिंबाची आवक होत असते. त्यानुसार आता डाळिंबाची आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक दरवर्षीप्रमाणे नाही. यावर्षी आवक अवघ्या 40 टक्क्यांवर आली आहे. हीच परिस्थिती सीताफळाच्या बाबतीतही आहे. सासवड आणि नगर, जुन्नरमधून सीताफळाची आवक सुरू झाली आहे. मात्र त्यांचेही प्रमाण कमी आहे. सध्या घाऊक बाजारातच डाळिंब 150 ते 200 रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात डाळिंबांचा दर 200 ते 300 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर, सीताफळाला 100 ते 200 रुपये किलोचा दर आहे.