काँग्रेस आय पक्षाचे माजी आमदार डी.एन.चौलकर यांचे प्रतिपादन
। मुरुड/जंजिरा । सुधीर नाझरे ।
शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अनेक पक्षांनी त्यांना पाठींबा दर्शविला. खास करून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य आहे. त्याचे आज लढाऊ क्रांतीकारी नेते आ. जयंत पाटील हे आहेत. यापुर्वी ज्येष्ठ नेते मराठवाड्यातून कै. केशवराव धोंडगे, पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूर येथून एन. डी. पाटील तसेच सांगोला येथून कै. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते हे लढाऊ वृत्तीचे होते. कै. प्रभाकर पाटील, कै. दत्ता पाटील यांच्यासारख्या नेत्यांमधून आ. जयंत पाटील हे घडले आहेत. आंदोलन करणे व झोपलेल्या शासनाला जाग आणणे हे कार्य शेतकरी कामगार पक्षच करु शकतो, असे वारंवार दृष्टीस आले आहे. त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असे प्रतिपादन माजी आ. डी.एन. चौलकर यांनी केले. काँग्रेस आय पक्षाचे मालाड, मुंबई येथून निवडून आलेले माजी आ. डी.एन.चौलकर यांनी त्यांच्या निवास्थानी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यापुढे बोलताना चौलकर यांनी सांगितले कि, किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराची प्रकरणे काढण्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केले आहे का? महाराष्ट्रात अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे काढत आहेत. योग्य कागदपत्र हातात लागल्यावर ते मीडिया समोर येतात व भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्याचं ढोंग करतात.महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून येथे ईडीचा ससेमिरा तर भ्रष्टाचार काढण्यासाठी सोमय्या हे गणित जुळले आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचार प्रकरणे काढल्याची फक्त माहिती देतात; परंतु तद्नंतर त्याचे पुढे काय करतात हे मात्र सांगत नाहीत. ज्यावेळी त्यांनी एखादे प्रकरण काढले, त्याची प्रसिद्धी मिळवली, त्याप्रमाणे त्या प्रकरणाचे पुढे काय झाले, चौकशीत काय निघाले, भ्रष्टाचार सिद्ध झाला का, या गोष्टीदेखील मीडियाला सांगणे अपेक्षित आहे. ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.
मागे एका नेत्याला दिवाळीत अटक होणार, त्याची चौकशी होऊन तो तुरुंगात जाणार, असे सोमय्या यांनी सांगितले. मात्र कालांतराने हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराची प्रकरणे काढण्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केले आहे का, याचे अधिकृतरित्या भाजपने उत्तर द्यावे, अशी मागणी माजी आ. चौलकर यांनी पत्रकार परिषदेमधून केली आहे.
महाराष्ट्रात कोणताही नेता प्रबळ होत असेल तर त्याच्यावर इडीची चौकशी लावली जाते. आज भाजपकडे अब्जो रुपयांचा निधी जमा आहे. भाजपमध्ये कोणी भ्रष्टाचार करीत नाही का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांनी मागील पाच वर्षात किती भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली. त्या प्रकारामधून निष्कर्ष काय निघाला, याची माहिती सुद्धा जनतेला द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी चौलकर यांनी केली आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणे काढल्यावर आठ ते दहा दिवस मीडिया समोर येतात; मग मात्र शांत का बसतात याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, अशी परखड प्रतिक्रिया सुद्धा यावेळी त्यांनी दिली आहे.
मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारने महारष्ट्राला मुक्त हस्ते मदत केली पाहिजे. हे प्रश्न न सुटल्याने अस्थिरता निर्माण होऊन संघर्ष सतत चालू रहाणार आहे. यासाठी केंद्राने राज्याला मदत करणे खूप आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. कोकण रेल्वेचे खासगीकरण कशासाठी, केंद्राकडे रेल्वे राहिली तर काय बिघडणार आहे. ज्या आदरणीय मधू दंडवते यांनी कोकणात रेल्वे आणली तिचे खासगीकरण करून दुसर्याला देऊन टाकणे हे कितपत योग्य आहे. रेल्वेच्या खासगीकरणावर कोकणातील जनता आक्रमक होणे खूप आवश्यक असल्याचे मत चौलकर यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी परकीय देशातील उद्योगधंदे आणताना प्रकर्षाने महाराष्ट्राचा विचार करावा. जिथे भाजपची सत्ता आहे, तिथे उद्योगधंदे नेऊ नका. राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक झाली तर बेकारी सुद्धा हटणार आहे, हे ध्यानात ठेवावे.