वाशीच्या नारळीपाकची चवच न्यारी

| पेण | संतोष पाटील |
वाशीच्य ग्रामदेवतेच्या वार्षिक जत्रोत्सव उत्साहात सुरु झाला आहे. संपूर्ण रायगडात जागरुक देवस्थान असलेल्या आई जगदंबा देवीच्या उत्सवास हजारो भाविक येत असतात. त्याच बरोबरच येथे मिळणार्‍या नारळी पाकचा आस्वाद घेतल्याशिवाय या भाविकांचे मन तृप्त होत नाही. या नारळी पाकची चवच न्यारी असल्याची चर्चा भाविकांमध्ये होताना दिसते. गावचे वैशिष्टय म्हणजे या गावात तयार होणारा गोड आणि खमंग तयार होणारा नारळीपाक. वाशी गावात सुरवातीला कै.गजानन नागू मढवी हे खूप पूर्वीपासून आपल्या नाक्यावरच्या छोट्या दुकानामध्ये नारळाची वडी (नारळी पाक) विकत असत. ती बनविण्यासाठी ते पहिल्यापासून खूप मेहनत घेत होते. ज्या मुळे ही नारळाची वडी वाशी गावाची ओळख झाली होती.

परंतु हा वारसा त्यांच्या मुलाने व नातवाने कालांतराने वाढविला. यात्रे मध्ये वाशी गावातील दत्तात्रेय मढवी (दत्ता भाऊ) व त्यांच्या नातू रुपेश दत्तात्रेय मढवी यांनी त्यांच्या आजोबांनी सुरू करुन नावारूपाला आणलेला नारळी पाक बनवून विकण्यास सुरवात केली होती आणि त्याला लोकांचा असा काही प्रतिसाद मिळाला की बनविलेला सर्व नारळी पाक बघता बघता संपून गेला. मग प्रत्येक यात्रेत या नारळी पाकची व्याप्ती एवढी वाढत गेली की लोक आधीच पैसे देवून आपली नारळीपाक ची नोंदणी करुन ठेवत करून ठेवत.

मढवीचां नारळी पाक पेण,रायगड,महाराष्ट्र मध्ये सर्व खवय्यांच्या पसंतीचा विषय झाला होता. परंतु आलेला वृद्धापकाळ आणि मोठा मुलगा कामानिमित्ताने पनवेल येथे गेल्यामुळे नारळी पाक बनविणे आता सोपे झाले नव्हत. त्यातच वाढलेली महागाई त्या मुळे सर्वसामान्यांना माफक दरात हा पदार्थ उपलब्धही करता येत नव्हते त्या मुळे या मढवी कुटुंबाने नाईलाजाने का होईना पण ज्या मुळे ते नावारूपाला आले तो नारळी पाक बनविणे बंद केले आणि वाशी गावाची शान असणारा हा पदार्थ गावात मिळेनासा झाला होता.

परंतु लोकांच्या आवडीमुळे आणि वाशी गावाची शान असणारा हा नारळी पाक पुन्हा लोकांना उपलब्ध व्हावा म्हणून वाशी गावातील प्रसिद्ध फरसाण व्यापारी अंबाजी पिटकुर पाटील (मालफेवाले) काका आणि त्यांचा मुलगा प्रमोद अंबाजी पाटील यांनी हा नारळी पाक पुन्हा बनवून विकण्यास सुरुवात केली. मढवी यांच्या नारळी पाका सारखी चव येण्यासाठी प्रमोद पाटील याला खूप मेहनत घ्यावी लागली व त्याने ती घेतली त्यामुळेच वाशी गावाची शान असणारा नारळी पाक पुन्हा एकदा वाशी गावाच्या नाक्यावरील श्री.दत्तगुरु स्वीट मार्ट या दुकानामध्ये मध्ये मिळू लागला. त्या मुळे मी मढवी आणि पाटील कुटुंबाला सलाम करतो ज्यांनी वाशी गावाची शान असणारा नारळी पाक हा पदार्थ बनविला आणि वाढविला.

Exit mobile version