। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेचे उपशिक्षक तथा रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) समन्वयक अमित पंड्या यांना 40 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.18) करण्यात आली.
रायगड जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षकांचे जून आणि जुलै या महिन्याचे वेतन अदा करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयाकडून निघण्याकरता अमित पंड्या यांनी चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार या शिक्षकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. 4 सप्टेंबर रोजी पनवेल येथील एसटी स्टँडमध्ये 40 हजार रुपयाची रक्कम घेण्याचे पंड्या यांनी तात्काळ मान्य केले होते. मात्र, त्यांना संशय आल्याने ती रक्कम स्वीकारली नाही. यानंतर बुधवार मुंबई-गोवा महामार्गावरील खालापूर फाटा येथे सापळा लावण्यात आला होता. यावेळी पंड्या यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.