। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर शिक्षिकेने लेखी माफी मागितली.
खारघर गावातील सेक्टर 13 येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळेत 500 हून अधिक विद्यार्थी शिकतात. सहावी इयत्तेत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या विद्यार्थीनीला शिक्षिकेने सोमवारी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. याबाबत घरी काही सांगू नको, असा दमही तिने विद्यार्थिनीला दिला. मात्र अंगावर उमटलेले वळ पाहून तिच्या पालकांनी विचारणा केल्यानंतर विद्यार्थिनी रडू लागली आणि तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. पालकांनी मंगळवारी शाळेत जाऊन जाब विचारला असता मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पालकांसमोर पुन्हा असा प्रकार होणार नाही, अशी हमी दिली.







