डिझेल तस्करांवर कारवाईसाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

कारवाईची कुणकुण लागताच तस्कर पसार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
जहाजांतील डिझेलची तस्करी करून त्याचा साठा केला जात माहिती मिळताच कारवाईसाठी तहसील विभागाचे कर्मचारी निघाले खरे, पण याची कुणकुण लागलेले तस्कर गाशा गुंडाळून पसार झाले. त्यामुळे अधिकार्‍यांना हात हलवत परतावे लागल्याचा प्रकार नवी मुंबई विमानतळ बाधित क्षेत्रातील वाघीवली या ठिकाणी घडला आहे. दरम्यान, या कारवाईत कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही. परंतु, तसे काही निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात अशी ग्वाही तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली.

जेएनपीटी बंदरात येणार्‍या परदेशी जहाजातील कर्मचार्‍यांशी संधान बांधून समुद्रकिनार्‍यापासून दूर काही नॉटिकल मैल अंतरावर उभ्या राहणार्‍या जहाजातील डिझेल छोट्या बोटीत उतरवून खाडी मार्गाने तस्करी करण्याचे काम मागील काही वर्षांपासून जोरात सुरु आहे. पोलीस, तटरक्षक दल यांना या तस्करीची माहिती असून, त्यांच्या आशीर्वादानेच व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत, असा स्थानिकांचा आरोप आहे. परदेशी जहाजातून जवळपास 30 रुपये लीटरने मिळणारे हे डिझेल बाजारपेठेत जादा दराने विक्री करून महसूल बुडवण्याचे काम हे तस्कर करतात, असे म्हटले जाते.

प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ बाधित क्षेत्रात असलेल्या वाघीवली गावातील टाटा पावर हाऊसमागे असलेल्या खाडी किनार्‍यावर अशीच तस्करी करून आलेल्या डिझेलचा साठा करून वितरण केले जात आहे. काही वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकारची माहिती रायगडचे नवे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना मिळताच सदर ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना दिले. म्हसे यांच्या निर्देशानुसार वाघीवली येथे कारवाईसाठी निघालेल्या तहसील विभागाचे पथक कारवाईस्थळी पोहोचण्याआधीच कारवाईची माहिती मिळाल्याने तस्कर बोटींसहित पसारा झाल्याने तहसील विभागाच्या कर्मचार्‍यांच्या हाती काहीच लागले नाही.

विभागाच्या कर्मचार्‍यांचा डिझेल तस्करांशी काहीएक संबंध नाही. अगर असे संबंध असल्याचे पुरावे मिळाल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. – विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल


भरसमुद्रात उभ्या जहाजातून काढले जाणारे डिझेल लहान-लहान बोटीत भरून भरतीच्या वेळी खाडी मार्गाने आणण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.

*वाघीवली येथे बोटीतील डिझेल मोठ्या टाक्यांमध्ये भरले जाते. त्यानंतर 35-35 लीटरच्या ड्रममध्ये भरून या डिझेलचे वितरण केले जात असल्याची चर्चा आहे.

दररोज जवळपास 35 हजार लीटर साठा आणला जात असल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version