| मुरुड | वार्ताहर |
गेल्या दोन दिवसात वातावरणात मोठा बदल घडून आला असून, गारठा अधिक वाढला आहे. पर्यटन क्षेत्र असणार्या मुरूड तालुक्यात तापमान घसरले असून, शुक्रवारी सकाळी तापमानाचा पारा 20 सेल्सिअंशपर्यंत खाली आल्याने मुरुडकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांपूर्वी तापमानाचा पारा 22 ते 23 सेल्सिअंश होता. शुक्रवारी सकाळी येथे वातावरणात आभट पसरले होते. पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडगार वारे वाहत असल्याने गारठा पुन्हा वाढता आहे. पर्यटनासाठी वातावरण सुखद आहे. दुपारी, सायंकाळी समुद्रकिनारी थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे मुरूड, काशीद, नांदगाव किनारा पर्यटकांनी गजबजणार असे दिसून येत आहे. तालुक्याचे तापमान 20 सेल्सियस पर्यंत खाली घसरले होते. गारठा वाढल्याने ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. ज्येष्ठांना थंडीचा त्रास होण्याची शक्यता आधिक आहे. सायंकाळी समुद्रकिनारी देखील वाळूवर चालणार्या मंडळींची संख्या वाढलेली दिसत आहे.