पालीत भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत

। राबगाव/पाली । वार्ताहर ।

अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव व दहशत वाढत चालली आहे. येथील एकतापथमध्ये एका पिसाळलेल्या कुत्रीने तब्बल पाच ते सहा जणांना चावा घेतला आहे. भटके कुत्रे टोळ्यांनी पालीत सर्वत्रच फिरत असतात. त्यामुळे बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह नागरिक देखील या भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत.

पालीत बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी रोज असंख्य भाविक येत असतात. त्यामुळे पालीतील नागरिकांसह भाविकांना देखील या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा धोका आहे. मोठ्या झुंडीमध्ये फिरणारे कुत्रे तसेच जखमी अवस्थेतील कुत्रे पाहून नागरिक व भाविक भयभीत होत आहेत. येथील कचराकुंडया, रस्त्यावरील कचरा आणि उकिरड्यावरील खरकटे अन्न यावर भटक्या कुत्र्यांचे पालन पोषण होत असल्याचे चित्र दिसत आहे. सुदैवाने पाली व जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजच्या लस उपलब्ध आहेत. मात्र, अशा मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांबाबत प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिक संतापले आहेत. या भटक्या व मोकाट कुत्र्यांपासुन विद्यार्थी, लहान मुले व वृद्ध नागरिक आणि महिलांना अधिक धोका आहे.

15 श्‍वानांचे लसीकरण
शाझिया गोवारीकर यांनी नुकतेच त्यांच्या हॅप्पी अंब्रेला फाऊंडेशनतर्फे व टास्कफोर्स गोवा यांच्यासह 3 आठवड्यांचे नसबंदी व लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात सुधागडमधील 150 श्‍वानांची नसबंदी व लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 100 श्‍वान हे पाली येथील होते आणि इतर 50 श्‍वान हे वसुधा सोसायटी, पेडली इत्यादी ठिकाणचे होते. या कार्याबद्दल सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार, पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, पाली नगराध्यक्षा प्रणाली शेळके व नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरुणकर यांनी शाझिया गोवारीकर यांचा सत्कार केला व या मोहिमेचे कौतुक केले.

नगरपंचायतच्या सहकार्याने हॅप्पी अम्ब्रेला फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पालीतील शंभर कुत्र्यांचे नसबंदी व लसीकरण करण्यात आले आहे. लवकरच इतरही कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण या संस्थेच्या मदतीने करण्यात येईल. तसेच, पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात येईल. नागरिकांनी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी.

प्रणाली शेळके,
नगराध्यक्षा, पाली


पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटी रेबीज इंजेक्शन आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहेत. नागरिकांनी कुत्रा चावल्यास लागलीच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन अँटी रॅबीचे इंजेक्शन घ्यावे.

डॉ. शशिकांत मढवी,
तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड
Exit mobile version