। रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरातून पाच लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यांनी दोन संशयितांविरोधात रेवदंडा ठाण्यात तक्रार केली असून त्याची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे.
रायगड महिला पोलीस म्हणून रेवदंडा पोलीस ठाणे येथे पेण तालुक्यातील बार्वे येथील आरती एकनाथ पाटील या कार्यरत होत्या. त्यांनी रेवदंडा भोईवाडा येथील इमारन पावगी यांच्या चाळीमध्ये वास्तव्यासाठी भाडयाने रूम घेतले होता. त्याच्या रूमच्या शेजारी मधली एक रूम सोडून संशयित आरोपी मुमताज पिंजारी व मेहराज पिंजारी हे राहात होते. ते दोघेही नेहमी त्यांच्या रूममध्ये येत जात होते. यामधील मेहराज पिंजारी हे नेहमी त्याच्या रूममधील सामानाला हात लावत असत, त्यावेळी त्यांनी त्यास सामानाला हात लावू नकोस असे सांगायचे.
दरम्यान दि. 23 सप्टेबर 2024 रोजी त्यांना रेवदंडा पोलीस ठाणे येथून कार्यमुक्त करण्यात आल्याने त्या गावी निघून गेल्या होत्या. इमरान पावगी यांच्या भाडयाच्या रूममधून सामान व चीज वस्तू नेण्यासाठी त्या दि. 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आल्या. त्यांनी रूम उघडून आत प्रवेश केला व त्यानी ठेवलेली पाचशे रूपयांच्या एक हजार नोटा असलेल्या 5 लाख रूपयांची रक्कम पेटीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर रक्कम शेजारील रूममधील संशयित आरोपी मुमताज पिंजारी व मेहराज पिंजारी यांना पेटीच्या चावीचे ठिकाण माहित असल्याने त्यांनी चोरी केली असल्याची त्यांना खात्री असल्याने त्यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरोधात तक्रार नोंदविली.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास रेवदंडा पोलीस करत आहेत.