। पनवेल । वार्ताहर ।
अज्ञात चोरटयानी कळंबोली मधील एलआयजी वसाहतीत राहणार्या पोलिसाचे घर फोडून त्यांच्या घरातून सुमारे 17 लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला.
या प्रकरणातील तक्रारदार अमोल म्हात्रे (वय 41) कळंबोली सेक्टर-2 मधील एलआयजी वसाहतीत वुटुंबासह राहत असून, सध्या त्यांची नियुक्ती नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आहे. अमोल म्हात्रे यांच्या भावाच्या मुलीच्या वाढदिवस निमित्त त्यांचे सर्व कटुंबिय वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी पेण, सोनखार येथे गेले होते. तर अमोल म्हात्रे सीबीडीबेलापूर येथील नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात रात्रपाळीच्या डयुटीवर गेले होते. या कालावधीत अमोल म्हात्रे यांचे घर बंद असल्याने चोरटयांनी संधी साधुन पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी अमोल म्हात्रे यांच्या घरातील सुमारे 17 लाख रुपये किंमतीचे वेगवेगळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेली. सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अमोल म्हात्रे यांच्या घराच्या वरील मजल्यावर राहणार्या भाडेकरुला म्हात्रे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडल्याचे आणि दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी अमोल म्हात्रे यांना फोनवरुन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर म्हात्रे यांनी घरी धाव घेऊन पहाणी केली असता, घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अमोल म्हात्रे यांनी कळंबोली पोलीस ठाणेमध्ये चोरीबाबत तक्रार दाखल केली.