महिलेचे गंठण चोरून चोर पसार

| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील खांडा येथील तुलशी गृहसंकुलनासमोर माथेरान बसची वाट पाहात बसलेल्या महिलेची दोन तोळे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गळ्यातून हिसकावून चोर पसार झाले. याबाबत सदर महिलेने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माथेरान येथे राहणारी 45 वर्षीय महिला आखाडे ही आपल्या पतीसोबत नेरळमधून माथेरान येथे जाण्यासाठी नेरळ खांडा येथील तुलसी गृहसंकुलनासमोर माथेरान बसची वाट पाहात उभे होती.

बस येण्यासाठी उशीर असल्याने आखाडे यांचे पती हे बाजूला खरेदीसाठी गेले होते. तर सदर महिला ही बस स्टॉपच्या कठड्यावर बसली होती. यावेळी अर्धवट तोंड झाकलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणाने आखाडे या महिलेच्या जवळ येत गळ्यातील 70 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरून सदर चोरटा हा तुलशी गृहसंकुलनात असलेल्या युनियन बँक समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर बसलेल्या तरुणाच्या मागे बसून पसार झाला. या गुन्ह्याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे हे करीत आहेत.

Exit mobile version