चोर-पोलिसांचे थरारनाट्य! गुरे चोरणार्‍या टोळीचा पोलिसांनाच दणका

अंधाराचा फायदा घेऊन चोरटे फरार
। रोहा । जितेंद्र जोशी ।
रोहा तालुक्यात गुरे चोरणार्‍या टोळ्यांनी हैदोस मांडला आहे.रात्रीच्या अंधारात या टोळ्या गुरे चोरून नेत आहेत. पण अपुर्‍या पोलीस बळामुळे या चोरांवर कडक कारवाई झाली नाही.काल रात्री एका गुरे चोरणार्‍या टोळीने चक्क उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या गाडीलाच ठोकर देत नाकाबंदीला न जुमानता पोबारा केल्याने गुरे चोरणार्‍या टोळीने आता पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

मंगळवारी (दि.13) रात्री रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी जिल्हा गस्तीसाठी शासकीय वाहन एमएच 06 एए 524 या वाहनाने गस्त घालत होते. यावेळी रोहा तालुक्यातील भिसे खिंड येथे रात्री 11.30 च्या सुमारास सहा इसम गायींच्या गळ्यात फास अडकवून जबरदस्तीने टाटा योद्धा गाडी क्रमांक एमएच 48 टी 3158 या गाडीत भरत असताना आढळून आले. पोलीस गाडी संबंधित गाडीच्या जवळ नेताच गायी तिथेच ठेवून सदर इसम वाहनातून पळून जाऊ लागले. पोलीस अधिकार्‍यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. मात्र गाडीच्या चालकाने निडी गाव तसेच सानेगाव परिसरात पोलीस गाडीला रिव्हर्स येत ठोकून पोलीस वाहनात असलेल्या इसमाना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

चोरट्यांना अडविण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली. मात्र नाकाबंदीवर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगावर गाडी घालत चोरट्यांनी त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण केला.नाकाबंदीसाठी लावण्यात आले बॅरिकेट तोडून चोरांनी पोबारा केला. अखेर रस्त्यावर जेसीबी आडवा लावून या चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरांनी ताब्यातील पिकअप टेम्पो रस्त्यात सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलात पळ काढला. रात्री झालेल्या या थरार पाठलाग नाट्यानंतर रोहा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बाबर पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version