पनवेल रेल्वे स्थानकावरील प्रकार, खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
| पनवेल | प्रतिनिधी |
रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यानी कमालच केली आहे. स्थानक परिसरात उभी असलेली पोलिसांची दुचाकीच चोरून पोलिसांना एका प्रकारे आव्हान देण्याचे काम या चोरट्यानी केले असून, 31 डिसेंबरला घडलेल्या या घटनेच्या चार दिवसा नंतरही चोरीला गेलेली ही दुचाकी शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. मागील काही दिवसात पनवेल परिसरातून वाहन चोरी होण्याच्या घटनानंमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
चोरीच्या या घटना पूर्णपणे रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने वाहन चोरी करणारे चोरटे निर्ढावले आहेत. आता तर या निर्ढावलेल्या चोरट्यानी कमालच केली आहे. नवी मुबंई वाहतूक शाखेत पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मालकीची दुचाकीच चोरट्यानी लंपास केली आहे. या अधिकाऱ्याच्या मुलाने 30 डिसेंबर रोजी रात्रपाळीला कामावर जात असताना ही दुचाकी नवीन पनवेल बाजूला रेल्वे स्थानक परिसरात उभी केली होती. दुसऱ्या दिवशी कामावरून परतल्या नंतर आपली दुचाकी गायब झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली. मात्र तरी सुद्धा दुचाकी न सापडल्याने अखेर खांदेश्वर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे चोरीला गेलेल्या या दुचाकीवर पोलीस अशा अक्षरातील स्टिकर स्पष्ट पणे चिकटवलेले असताना चोरट्यानी ही दुचाकी चोरून नेण्याचे धाडस दाखवत पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.