| पनवेल | वार्ताहर |
जबरी चोरी केल्याप्रकरणी एकूण आठ आरोपींवर पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यातील सहा आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, सदरच्या घटनेनंतर दोन आरोपी पसार झाले होते. त्यांना खालापूर परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
पनवेलवरुन पुणे बाजूकडे मालाने भरलेला ट्रक घेऊन ट्रक चालक गेनलाल पटेल (35) हा चालला असताना त्याने पळस्पे हायवे पोलीस चौकीच्या पुढे 200 मीटरवर आपला ट्रक थांबवून लघुशंकेसाठी तो बाजूला गेला असताना अज्ञात इसमाने त्यांना हाताबुक्क्याने व जमिनीवर फरफटत नेऊन मारहाण केली होती. दरम्यान, त्याच्याकडील दोन मोबाईल फोन व रोख रक्कम असा ऐवज काढून घेऊन ते पसार झाले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्यावेळचे वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यातील सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. परंतु, या गुन्ह्यात सहभाग असलेले दोन आरोपी घटनेनंतर पसार झाले होते. याबाबत वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोनि. अनिरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पो.हवा.विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे, शिवाजी बाबर, सतीश तांडेल, राजकुमार सोनकांबळे आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे व गुप्त बातमीदाराद्वारे सदर आरोपी हे खालापूर परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपी रोहन उर्फ पाव नाईक, विशाल उर्फ आमदार पवार या दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.