चोरांनी पाच मंदिरे फोडली

चौक परिसरात चोरांचा सुळसुळाट

| रसायनी | वार्ताहर |

चौक नढाळ येथील पंचायतन मंदिरात शिरून चोरांनी दानपेटी फोडून त्यातील नोटा घेऊन पोबारा केला. त्याचबरोबर वावंढळ येथील दोन घरे फोडून चोरांनी हात साफ केल्याच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर नढाळ गाव असून, या गावच्या हद्दीत पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे व परिवाराने बांधलेले पंचायतन मंदिर आहे. अल्पावधीत या मंदिराची प्रसिद्धी झाली असून, एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून लोक रोज या ठिकाणी येत असतात. येथे वेगवेगळी पाच मंदिरे आहेत. नुकताच चोरांनी संरक्षक भिंतीवरून मंदिरात प्रवेश करून पाचही मंदिरांतील दानपेट्या फोडून त्यातील नोटा घेऊन पोबारा केला असून, चिल्लर तिथेच टाकून गेले. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोर कैद झाले असून, त्यांचा चेहरा दिसत आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणेला चोर पकडण्यास वेळ लागणार नाही. साधारण चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. खालापूर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना वावंढळ येथील अनंत भिवाजी कदम यांच्या घरातील कपाट फोडून सोन्याचा हार, ठुसी, अंगठी, कानातील जोड, नथ असा चाळीस हजार रुपयांच्या ऐवजाबरोबर पाच हजार रोकड लंपास केली आहे. दुसरी घरफोडी गौरव कदम यांच्या घरी झाली असून, दोन सोन्याची नाणी, दोन सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीचे जास्वंद फूल असा सुमारे सहा हजार रुपयांचा ऐवज, तसेच पंधरा हजार रोख घेऊन चोरांनी हात साफ केले असून, खालापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकचे सपोनि युवराज सूर्यवंशी व त्यांचे पोलीस तपास करीत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याची उकल लवकर होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version