। पनवेल । वार्ताहर ।
खारघर येथील फिटनेस जिमसमोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी जबरदस्तीने खेचण्याची घटना घडली. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 10 येथील फिटनेस फॅक्टरी जिमच्या गेटवर 38 वर्षीय तरुण उभा होता. त्याच वेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती त्याच्या पाठीमागून आले. दोघांचेही तोंड मास्कने झाकलेले होते, तर डोक्यावर टोपी घातलेली होती. या दोघांनी तक्रारदार तरुणाला धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने खेचून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले. सोनसाखळीची अंदाजे किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.







