पावसामुळे पराभव टळला;मालिका मात्र निसटली

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने 18 षटकांत एक गडी गमावून 104 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर पाऊस आला आणि पुढील सामना होऊ शकला नाही. मैदान ओले झाल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडकडून सलामीवीर फिन ऍलनने 54 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 57 धावा केल्या, तर डेव्हन कॉनवेने 51 चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद 38 धावा केल्या. तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा डाव 47.3 षटकांत 219 धावांत गुंडाळला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही.

धवन आणि गिलच्या जोडीला संथ सुरुवात झाली पण मोठी भागीदारी करता आली नाही. गिल 22 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. यावेळी संघाची धावसंख्या 39 धावा होती. यानंतर भारतीय संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. कर्णधार धवन 28, ऋषभ पंत 10 आणि सूर्यकुमार यादव 6 धावा करून बाद झाला.

दरम्यान श्रेयस अय्यरने एक टोक सांभाळत 59 चेंडूत 49 धावा केल्या. अखेरीस, वॉशिंग्टन सुंदरच्या 64 चेंडूत 51 धावांनी भारताची धावसंख्या 200 च्या पुढे गेली. दीपक हुड्डा आणि दीपक चहर यांनी 12-12 धावा केल्या. न्यूझीलंडकडून अ‍ॅडम मिलने आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी तीन बळी घेतले. लॉकी फर्ग्युसन आणि मिचेल सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तीन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकणार्‍या न्यूझीलंडने पहिला सामना सात विकेटने जिंकला, तर दुसरा सामना पावसामुळे वाहून गेला.

Exit mobile version