कलाकारांच्या श्रमदानातून नाटयगृहाची पुर्नउभारणीची तिसरी घंटा

आ जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्यगृहाचे भूमिपूजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असणारे पी एन पी नाट्यगृह भीषण आगीत भस्मसात झाल्यानंतर हताश झालेल्या नाटयरसिकांसाठी पुन्हा एकदा या नाट्यगृहाच्या उभारणीचा संकल्प आमदार जयंत पाटील आणि नाट्यगृहाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी दुर्घटनेच्या दिवशीच केला. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम आणि अलिबाग मधील अनेक कलाकारांनी श्रमदान करुन या नाटयगृहाच्या पुर्नउभारणीची तिसरी घंटा देऊन पुर्नउभारणीचा शुभारंभ केला.

नाट्यगृहाच्या वर्धापनदिनीच आ जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 7 जुलै रोजी नाट्यगृहाचे भूमिपूजन प्रसिद्ध अभिनेते, चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम आणि आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कलाकारांच्या सांस्कृतिक विकासासाठी पीएनपी नाट्यगृहाची स्थापना करण्यात आली होती. त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून अनेक कलाकार सांस्कृतिक आणि तांत्रिकदृष्ट्या विकसित झाले, कलाकारांना आत्मविश्‍वास मिळाला होता, सर्व मुंबई आणि अलिबागच्या कलाकारांच्या आग्रहास्तव सर्वांच्या सहकार्याने हे नाट्यगृह लवकरचं आपण उभे करणार असल्याचा विश्‍वास आ. जयंत पाटील यांनी बोलून दाखवला.


नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ प्रसंगी स्थानिक कलाकार आणि रसिकांच्या वतीने श्रमदान करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, चित्रा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अ‍ॅड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, विक्रांत वार्डे, युवराज पाटील, अभिनेते राजन पांचाळ, अभिनेत्री श्रद्धा पोखरणकर, सागर नार्वेकर, किशोर म्हात्रे, नृत्य दिग्दर्शक अमोल कापसे, जयेश पाटील, उमेश कोळी यांच्यासह सर्व नगरसेवक आणि मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी रिघ लावली होती. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तर राज्यभरातून भ्रमणध्वनी वरून संपर्क करून शुभेच्छा दिल्या

Exit mobile version