। मुंबई । प्रतिनिधी ।
बंगळूर कसोटीत न्युझीलंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना साथ देणार्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज ढेपाळले होते. यानंतर पुण्यातील फिरकी गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर मिचेल सँटनरच्या प्रभावी गोलंदाजीपुढे पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांकडून निराशा झाली. आता मुंबईत 1 नोव्हेंबरपासून तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या कसोटीतील खेळपट्टीकडे लक्ष असणार आहे.
कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती भारतीय संघावर कोसळली आहे. आता मायदेशात व्हाईटवॉशची नामुष्की ओढवण्याचे संकट रोहित शर्माच्या ब्रिगेडवर घोंघावत आहे. यामधून भारतीय संघ बाहेर येतो का, याचे उत्तर आगामी काळात मिळेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही नेहमी फलंदाजी व गोलंदाजी अशी दोन्हीला मदत करणारी म्हणून ओळखली जाते. या स्टेडियमच्या खेळपट्टीवर लाल मातीचा थर असतो. येथे चेंडूला उसळी मिळते. तसेच, चेंडूला फिरकही मिळते. वेगवान गोलंदाजांसह फिरकी गोलंदाजांनाही येथे मदत मिळते. शिवाय, वानखेडे स्टेडियमच्या आऊटफिल्डवर चेंडू वेगवान जात असल्यामुळे फलंदाजांना धावाही करण्यास मदत होते. धावांचा पाऊसही येथे पडतो.